Sun, Nov 18, 2018 21:54होमपेज › Ahamadnagar › ‘कृषी संजीवनी’ला २५टक्केच प्रतिसाद

‘कृषी संजीवनी’ला २५टक्केच प्रतिसाद

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 05 2017 12:32AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यात मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनला अवघा 25 टक्केच प्रतिसाद मिळाला असून, जवळपास 88 हजार शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदवला. या शेतकर्‍यांनी त्यांच्या वीज बिलापोटी 35 कोटी 15 लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. मात्र, जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार शेतकर्‍यांनी सुलभ हप्ते तसेच व्याज व दंडमाफीसह थकबाकीमुक्त होण्याची संधी गमावत या योजनेकडे पाठ फिरविली.

राज्यातील थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या थकित वीजबिलातील दंड व व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू बिलासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली. शेवटच्या टप्प्यात योजनेला प्रतिसाद वाढविण्यासाठी 30 हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकीसाठी तीन हजार रूपये, तर 30 हजारांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी पाच हजार रुपये भरून योजनेचा लाभ देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच वीज बिलाबाबतच्या सर्वच शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबर महिन्यात फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले होते. 

मात्र, तरीही जिल्ह्यातील थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांनी या योजनेकडे पाठच फिरवली. योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील 87 हजार 649 कृषिपंप ग्राहकांनी महावितरणकडे भरणा केला आहे. एकूण थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांच्या तुलनेत 25 टक्के ग्राहकांनीच योजनेत सहभाग नोंदविला आहे. तर 2 लाख 69 हजार शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठच फिरवली. तब्बल 1338 कोटींपैकी अवघी 35 कोटींची वसुली झाल्याने, 1300 कोटी रूपयांची बाकी कायम आहे. त्यामुळे महावितरण आता कृषिपंप ग्राहकांवर कारवाईचा काय बडगा उगारते, याकडे लक्ष लागून आहे.