Fri, Aug 23, 2019 14:41होमपेज › Ahamadnagar › प्रेमसंबंधातून घडले ‘ऑनर किलिंग’

प्रेमसंबंधातून घडले ‘ऑनर किलिंग’

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:31PM

बुकमार्क करा
नाशिक/नगर : प्रतिनिधी

सोनई तिहेरी दलित हत्याकांड म्हणजे अतिशय क्रूरतेने घडलेले ‘ऑनर किलिंग’. कामाचा जास्त मोबदला मिळणार, या आमिषाने त्याने आपल्या दोन मित्रांनाही बोलावून घेतले. परंतु, नियतीने पुढे काय वाढून ठेवलेय, याची त्यांना पुसटशी कल्पनाही आली नाही. प्रेमसंबंध असलेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी हा टाकलेला डाव त्यांच्या लक्षात आला नाही. अन् अतिशय क्रूरतेने शरीराचे तुकडे करून या तिघा तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या खटल्यात कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून सहाजण दोषी ठरले आहेत. आता त्यांच्या शिक्षेकडे सर्वांचे लक्ष आहे.
याबाबत माहिती अशी की, नेवासा फाटा येथील त्रिमूती शैक्षणिक संकुलामध्ये सफाई कर्मचारी म्हणून सचिन घारु हे काम करीत होते. त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एका तरुणीसोबत सचिनची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. दोघांचे प्रेम बहरत असतानाच, याची कुणकुण संबंधित शैक्षणिक संस्थेच्या जेसीबीवरील चालक अशोक सुधाकर नवगिरे याला लागली. त्याने याची माहिती तरुणीचे नातेवाईक पोपट उर्फ रघुनाथ दरंदले यांना दिली. त्यामुळे दरंदले यांचा संताप अनावर झाला. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने पोपट दरंदले यांनी रमेश विश्‍वनाथ दरंदले, प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले, संदीप माधव कुर्‍हे, अशोक रोहिदास फलके यांना प्रेमसंबंधाबाबत सांगितले. त्यांनी सचिनच्या खुनाचा कट रचला. 

अशोक नवगिरे व माधव कुर्‍हे यांच्या मदतीने सचिनला दरंदले वस्तीवरील शौचालयाची टाकी साफ करण्याच्या बहाण्याने बोलाविले. या कामाचा मोबदला वाजवीपेक्षा जास्त म्हणजेच चार हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे सचिन घारू याने कामाचा आवाका पाहून राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे आणि संदीप थनवार यांनाही सोबत नेले. 1 जानेवारी 2013 रोजी दुपारी बाराच्या सुमारास तिघेही संदीप याच्या दुचाकीवरून (एमएच 17 , एपी 8369) गणेशवाडी येथील दरंदले वस्तीवर पोहोचले. त्यांना शेत गट नं. 299 मधील शौचालयाच्या टाकीचे थोडे काम करू दिले. त्यानंतर आरोपी शेतावर जमले. सुरुवातीस संदीप थनवार याचे पाय पकडून त्याचे डोके सेफ्टी टँकमध्ये बुडवले. जीव वाचवण्यासाठी त्याने प्रतिकाराचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्याला तेथेच मारुन टाकले. हे दृश्य पाहून राहुल आणि सचिन घटनास्थळावरून पळून जाऊ लागले. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून ऊस तोडणीसाठी वापरण्यात येणार्‍या कोयत्याने राहुलच्या डोक्यावर पाठीमागून वार करून जीवे मारले. दोघांना खून झाल्यानंतर नात्यातील तरुणीचे ज्याच्याशी प्रेमसंबंध होते, त्या सचिनकडे मोर्चा वळविला. त्याला पकडून शेतातील खड्ड्यात नेले. तेथे वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये जिवंत सचिन टाकले व गुडघ्यापासून दोन्ही पाय आणि कोपर्‍यापासून दोन्ही हात कापले. तरीही तो जिवंत राहिल्यानंतर आरोपींनी त्याची मान अडकित्त्यात टाकून धडावेगळी केली. यानंतर मृतदेहाचे तुकडे केले व शेतातील कोरड्या बोअरवेलमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे सचिन यांचे काही अवयव आणि राहुलचा मृतदेह शेतातील कोरड्या असलेल्या 40 फूट खोल विहिरीत खड्डा करून पुरले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी स्वत:च्या अंगावरील कपडे शेतातच जाळले. 

याप्रकरणी सुरुवातीस स्थानिक पोलिसांनी तपास केला. मात्र, वाढता राजकीय हस्तक्षेप आणि मृतांच्या नातेवाईकांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवरून हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केला. साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी हा खटला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. या घटनेत एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. तरीही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे 6 आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यास मदत झाली, तर एकाविरुद्ध पुरावा मिळू शकला नाही.