होमपेज › Ahamadnagar › शासकीय खरेदी ‘ई-मार्केटप्लेस’वर

शासकीय खरेदी ‘ई-मार्केटप्लेस’वर

Published On: Feb 28 2018 1:19AM | Last Updated: Feb 28 2018 12:31AMनगर : प्रतिनिधी

सरकारी कार्यालयात खरेदी करण्यात येणार्‍या प्रत्येक वस्तूची खरेदी आता ऑनलाईन करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाने ‘ई - मार्केटप्लेस’ तयार केले असून, त्यावर टाचण्यांपासून ते गाड्यांपर्यंत सर्व वस्तू उपलब्द्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे बाहेरच्या दुकानातून होणारी खरेदी बंद होणार आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, मंडळे, महामंडळे  तसेच राज्य सरकारच्या सर्व विभागांना ही खरेदी बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय खरेदी धोरणांतर्गत खरेदी प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत.

शासकीय  संस्था, विभागांकडून होणार्‍या वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने ई मार्केटप्लेस (ॠशच) हे पोर्टल विकसित केले आहे. यावर करण्यात येणारी खरेदी पद्धत ही संपूर्णतः मानवी हस्तक्षेपाशिवाय अशी ऑनलाईन असून, त्यामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. तसेच नेमक्या, योग्य व नामांकित दर्जाच्या वस्तूचा पुरवठा वाजवी किमतीत उपलब्द्ध होणार आहे. खरेदी करण्यासाठी खरेदीदाराला कार्यालयीन ई-मेलसह नोंदणी करावी लागेल. पोर्टलवर उपलब्द्ध असलेल्या 5 हजारांपासून ते 50 हजारांपर्यंतची खरेदी योग्य दर्जा, विनिर्देश व पुरवठा कालावधीत पूर्तता करणार्‍या पुरवठादाराकडून करता येईल.

एखादी वस्तू व सेवा पोर्टलवर उपलब्द्ध नसल्यास 50 हजारांपर्यंतची खरेदी थेट जागेवर करता येणार आहे. 50 हजार ते 3 लाखांपर्यंतची खरेदी मार्केटप्लेसवर निविदेशीवाय करता येणार आहे. तीन लाख पेक्षा जास्त रकमेची खरेदी असल्यास या मार्केटप्लेसवर ऑनलाईन निविदा मागविण्याची सुविधा उपलब्द्ध करून देण्यात आलेली आहे. मार्केटप्लेसवर वाहनांचीही खरेदी करता येणार आहे. 1 कोटी रुपयांच्या आतील वाहनांची खरेदी करता येणार असून त्यापुढील रकमेची गाडी असल्यास त्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. विक्रेत्यांनाही या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीशिवाय खरेदीदार अथवा विक्रेत्यांना वस्तू वा सेवांची खरेदी-विक्री करता येणार नाही. मार्केटप्लेसवर सर्व प्रकारची स्टेशनरी, संगणक, संगणकाचे सुटे भाग, सायकल, चारचाकी वाहने आदी वस्तू उपलब्द्ध आहेत.