Sat, Jul 20, 2019 15:24होमपेज › Ahamadnagar › न्यू आर्टस्मध्ये सेना-राष्ट्रवादीत ‘राडा’!

न्यू आर्टस्मध्ये सेना-राष्ट्रवादीत ‘राडा’!

Published On: Jan 05 2018 1:04AM | Last Updated: Jan 04 2018 10:15PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीवेळी येथील लालटाकी रस्त्यावरील न्यू आर्ट्स महाविद्यालयात शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहावयास मिळाला. निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार जिंकल्यानंतर घोषणाबाजी झाल्याने दोन्ही गट आमने - सामने आले होते. दोन्ही गटांनी तोफखाना पोलिसांत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्यावरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, विद्यापीठ सचिव पदासाठी महाविद्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेकडून विशाल सकट तर राष्ट्रवादीकडून उमेश आमटे रिंगणात होते. तसेच अपक्ष म्हणून पानसरे व मनवेलीकर या दोन विद्यार्थिनींनीही नशीब आजमावून पहिले.

एकूण 35 मतदार असलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विशाल सकट याने 18 मते मिळवून बाजी मारली. आमटे यास 8, पानसरे हिला 6 तर मनवेलीकर  हिला 3 मते मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी सकट व महाविद्यालयातील काही प्राध्यापकांना शिवीगाळ केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या समर्थकांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या बाहेर आले. शिवीगाळ व परस्परविरोधी घोषणाबाजी झाल्याने वातावरण तापले होते.

या घटनेसंंदर्भात राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकार्‍याने तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत शिवसेना नगरसेवक विक्रम राठोड, योगीराज गाडे यांच्यासह दीपक कावळे, शुभम बेंद्रे, प्रकाश नरसाळे, दीपक भोसले, ऋषभ भंडारी आदींसह दहा ते पंधरा जणांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर शिवसेनेच्या एका महिला पदाधिकार्‍यानेही राष्ट्रवादीच्या सहा जणांविरोधात शिवीगाळ व धक्काबुक्की केल्यावरून गुन्हा दाखल केला. त्यामध्ये सुहास शिरसाठ, सूरज जाधव, रामा वाघ, संतोष लांडे, वैभव वाघ, अंकुश सत्तर यांचा समावेश आहे.