Sun, May 26, 2019 08:41होमपेज › Ahamadnagar › नियमबाह्य निविदेसाठी दबाव

नियमबाह्य निविदेसाठी दबाव

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:30PMनगर  : प्रतिनिधी

‘निरी’च्या प्रमाणपत्रावरुन वादग्रस्त ठरलेल्या बुरुडगाव कचरा डेपोतील खतनिर्मिती प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आक्षेप घेत निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘निरी’ची अट समाविष्ट करुन नव्याने निविदा मागविण्याचे आयुक्‍तांनी मान्य केलेले असतांनाही पदाधिकार्‍यांच्या दबावाखाली नियमाबाह्य निविदा मंजूर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत सोमवारी (दि.22) आयुक्‍तांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

खतनिर्मिती प्रकल्पाचा ठेका घेणार्‍या संस्थेकडे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. सदरचे प्रमाणपत्र असलेल्या संस्थेलाच निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल, अशी अट टाकणे अपेक्षित होते. यशस्वी ठेकेदाराला ‘निरी’चे प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक राहील, अशी चुकीची अट टाकून शुध्दीपत्रक काढण्यात आले आहे. गुरुवारी (दि.18) याबाबत आयुक्‍तांशी समक्ष चर्चा करुन ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली.

त्यानंतर नव्याने निविदा काढण्याचेही त्यांनी मान्य केले होते. मात्र त्यानंतर काही पदाधिकार्‍यांनी आयुक्‍तांवर दबाव टाकून नियमबाह्य असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण करणेबाबत मंजुरी घेतली असल्याचा आरोप छिंदम यांनी केला आहे. राजकीय दबावाला बळी पडून नियमबाह्य प्रक्रिया पूर्ण करु नये. ‘निरी’चे प्रमाणपत्र असलेल्या संस्थेलाच ठेका घेता येईल, अशी टाकून नव्याने निविदा प्रसिध्द करावी, अशी मागणी छिंदम यांनी यांनी केली.