होमपेज › Ahamadnagar › कोपर्डीतील आरोपींबाबत कारागृहात खोटे दूरध्वनी

कोपर्डीतील आरोपींबाबत कारागृहात खोटे दूरध्वनी

Published On: Dec 03 2017 1:10AM | Last Updated: Dec 02 2017 11:13PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

कोपर्डी ‘निर्भया’कांड प्रकरणातील आरोपींना तातडीने येरवडा कारागृहात हलवा, असे म्हणून मुख्यमंत्र्यांचे खासगी पीए व अपर पोलिस महासंचालकांच्या नावाने नगरच्या उपकारागृहात तोतया व्यक्तीने फोन केले. बुधवारी (दि. 29) सायंकाळी 8 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान हे फोन कॉल्स आले. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कोपर्डी ‘निर्भया’कांड प्रकरणातील आरोपींना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

त्यावेळी सायंकाळी 6 वाजता जिल्हा उपकारागृहाच्या दूरध्वनीवर एका मोबाईलवरून फोन आला. समोरून बोलणारा व्यक्ती म्हणाला की, ‘मी मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए कुलकर्णी बोलतोय. तीनही आरोपींना फाशी झालेली असताना तुम्ही त्यांना उपकारागृहात ठेवले आहे. त्यांना तुम्ही अर्धा तासात बाहेर काढून येरवडा येथे हलवा. तुमच्या कर्मचार्‍यांना घरी सोडू नका.’ या कॉलनंतर पुन्हा फोन आला. ‘मी एसीपी बोलतोय. आता आरोपी कोर्टातून निघाले आहे. त्यांना न थांबविता येरवडा जेलला पाठवा.’  

हे दोन फोन आल्यानंतर पुन्हा रात्री 8 वाजता उपकारागृहाच्या दूरध्वनीवर फोन आला. तो फोन तुरुंग अधिकारी शामकांत शेडगे यांनी उचलला. समोरून बोलणारा व्यक्ती म्हणाला की, ‘मी पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय बोलतोय. तुम्ही कोपर्डीतील आरोपींना तातडीने वर्ग करा. ते येरवडा कारागृहात सुरक्षित राहतील. त्यांना नागपूरला पाठवू नका.’ अशा पद्धतीने तीन तोतयागिरी करणारे फोन उपकारागृहात आले. हे फोन बोगस व तोतयागिरी करणारे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तुरुंग अधीक्षक नागनाथ सावंत यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कल्पना शिरदावडे या करीत आहेत.