Thu, Apr 25, 2019 15:59होमपेज › Ahamadnagar › जवखेडेची प्रत्येक गुरुवारी सुनावणी

जवखेडेची प्रत्येक गुरुवारी सुनावणी

Published On: Dec 22 2017 1:24AM | Last Updated: Dec 21 2017 10:54PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी दिलीप जाधव याची मोटारसायकल पाथर्डी पोलिसांनी जप्त केली होती. या कारवाईच्या वेळी उपस्थित असलेलेे पंच सचिन लबडे यांची साक्ष व उलट तपासणी काल (दि.21) पूर्ण झाली. या खटल्याची यापुढे प्रत्येक आठवड्यातील गुरूवारी सुनावणी होणार आहे.

येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांच्यासमोर जवखेडे खालसा (ता.पाथर्डी) तिहेरी हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. या हत्याकांडातील आरोपी दिलीप जाधव याने गुन्ह्यात मोटारसायकलचा वापर केल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त करताना हॉटेल व्यावसायिक सचिन लबडे आणि राजू खान यांनी पंच म्हणून काम पाहिले होते. 

विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी सरतपासणी घेतली. लबडे यांनी साक्षीत सांगितले की, पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील यांनी दि.20 डिसेंबर 2014 रोजी पंच होण्याबाबत विचारणा केली. पंच होण्यास आपण संमती व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडातील आरोपी दिलीप जाधव याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आपल्याला जप्त करायची आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांनी मोटारसायकल आणली आहे. पाथर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात ही मोटारसायकल दाखविण्यात आली. या मोटारसायकलचा चेसी नंबर आणि इंजिन नंबर दाखविण्यात आल्या. त्यानंतर कॉम्प्युटरवर लेखी पंचनामा टाईप करून दाखविण्यात आला. तो पंचनामा आम्हा दोघा पंचांना वाचून दाखविण्यात आला. तो बरोबर असल्याची खात्री झाल्याने दोघांनी पंच म्हणून त्यावर सह्या केल्या. पंचनामा हा रात्री सव्वा आठ ते नऊ यावेळेत पूर्ण झाला. न्यायालयात हा पंचनामा दाखविल्यावर त्यावरील सही आपली असल्याचेही त्यांनी ओळखले. 

 आरोपींच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली. पोलिसांशी ओळख असल्याने आणि संबंध टिकविण्यासाठी पंच झाले का, असे विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. पोलिस ठाण्याजवळ वडापावचे दुकान असल्याने पंच झाले का, असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर पोलिस ठाण्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर वडापावचे दुकान असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या वेळेस पंचनामा केला, त्यावेळेस पोलिस ठाण्याच्या आवारात अंधार होता. वीज गेलेली होती का, असे विचारले असता, वीज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर व्यवसायातील भागीदारी, पूर्वी पंच म्हणून साक्ष दिली का, तसेच अन्य गुन्ह्यांच्या अनुषंगानेही प्रश्‍न विचारण्यात आले. त्यास वस्तुस्थितीला अनुसरून त्यांनी उत्तरे दिली. 

या खटल्याचे कामकाज लवकर होण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी सुनावणी घेण्याचे ठरविण्यात आले.  पुढील सुनावणी दि.11, दि.18 आणि दि.25 जानेवारी 2018 रोजी होणार आहे.