Sat, Mar 23, 2019 16:51होमपेज › Ahamadnagar › आठ अधिकार्‍यांची होणार चौकशी!

आठ अधिकार्‍यांची होणार चौकशी!

Published On: Jan 17 2018 1:55AM | Last Updated: Jan 16 2018 10:29PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्याप्रकरणी महापालिकेच्या 5 अधिकार्‍यांसह शासननियुक्त असलेल्या 3 अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त घनश्याम मंगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. एकूण प्रकरणात प्राथमिक जबाबदारी अभियंता रोहिदास सातपुते व पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे यांच्यावर प्रस्तावित करण्यात आली आहे. आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट असल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे व सहाय्यक संचालक संतोष धोंगडे या चौकशी अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालात गंभीर अनियमितता व मनपाची फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर काल (दि.16) आयुक्त मंगळे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात, शहर अभियंता विलास सोनटक्के, अभियंता रोहिदास सातपुते, बाळासाहेब सावळे, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, नानासाहेब गोसावी, लिपिक भरत काळे यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. ठेकेदाराने सुनावणीकडे पाठ फिरविली असून मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनीही म्हणणे सादर केलेले नाही. झिरपे यांच्याकडून म्हणणे मागविण्यात येईल. 19 कामांपैकी 10 कामांवर उपायुक्त राजेंद्र चव्हाण व 9 कामांवर उपायुक्त दराडे यांच्या सह्या आहेत. चव्हाण हे रजेवर असल्याने त्यांचे जबाब घेण्यात आलेले नाहीत. कामांची पाहणी करण्याबाबत शहर अभियंत्यांची 5 टक्केच जबाबदारी नियमानुसार आहे. विभागप्रमुखांनी सादर केलेल्या देयकांच्या प्रस्तावातील कामांचे फोटो व अधिकार्‍यांच्या मंजुरीच्या, पाहणीच्या सह्या पाहून मी मंजुरी दिली असल्याचे सोनटक्के यांचे म्हणणे आहे. याबाबतही स्पष्टपणे त्यांना पुन्हा विचारणा केली जाईल, असे ते म्हणाले.

चौकशी अहवालातील गंभीर अनियमिततेबाबत सावळे, सातपुते, काळे, प्रभाग अधिकारी सारसर, गोसावी यांची खातेनिहाय चौकशी शासनाच्या पॅनलवरील वर्ग 1 च्या सेवानिवृत्त अधिकार्‍यांमार्फत केली जाईल. उपायुक्त चव्हाण, दराडे यांच्या चौकशीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केले जातील. तर लेखाधिकारी झिरपे यांचे म्हणणे घेऊन त्यांचीही चौकशी केली जाईल. प्रस्ताव तयार करणे, प्रशासकीय मंजुरी घेणे, बिले तयार करणे, मंजूर करणे याबाबची प्राथमिक जबाबदारी अभियंता सातपुते व सावळे यांचीच आहे. त्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून केडीएमसी करणारे लिपिक काळे यांनाही नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांचे म्हणणे घेऊन त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच प्रभाग अधिकार्‍यांनीही कामांचे पाहणी अहवाल दिलेले आहेत. या अधिकार्‍यांच्या खातेनिहाय चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. आर्थिक फसवणुकीबाबत चौकशी अहवालानुसार ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यासाठी शहर अभियंत्यांना सूचना देण्यात आलेल्या असून पोलिसांनाही चौकशी अहवालाची प्रत कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, बजेट रजिस्टरला नोंद नसल्याचे तसेच प्रभाग 1 व 28 मधील नगरसेवकांनी कामे सुचविली नसल्याचे सांगितले आहे. मुख्य लेखापरीक्षक खरात यांची सही बनावट असल्याचेही स्पष्ट झालेले आहे. ज्येष्ठता यादी डावलून देयके अदा करण्यात आल्याचा ठपका मुख्य लेखाधिकार्‍यांवर ठेवण्यात आला होता. मात्र, सदर कामांसाठी तरतूद असून ज्येष्ठता यादीचा यात संबंध नसल्यामुळे ही शिफारस फेटाळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, फाईल चोरी, बनावट सहीबाबत मनपाने तक्रार दाखल केलेली आहे. त्यांना कागदपत्रेही देण्यात आलेली आहेत. मनपाचे अधिकारी फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात बसून असल्याचे आयुक्त मंगळे यांनी सांगितले.