Tue, Mar 19, 2019 20:30होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यातील महामार्गांचे भाग्य उजळणार!

जिल्ह्यातील महामार्गांचे भाग्य उजळणार!

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 10:34PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

शहर व जिल्ह्यातून जाणारे सर्व महामार्ग आता राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित झाले असल्याने त्यांचे भाग्य उजळणार आहे. या महामार्गांवर सुरू होणारी विकासकामे जलदगतीने होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागीय कार्यालय नगर येथे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतीच त्यास मंजुरी देत तसे पत्रही दिले आहे.

जिल्ह्यातील या सर्व महामार्गांच्या विकासास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून, लवकरच मोठी विकास कामे या सर्व  राष्ट्रीय महामार्गांवर सुरु होणार आहेत. ही विकासकामे जलद गतीने व्हावीत, तसेच कामातील अडथळे दूर करता यावेत, यासाठी नगर शहरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कार्यालय सुरू करण्याची मागणी करीत खा.दिलीप गांधी यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, हे कार्यालय नगरला होणार असल्याने ही सर्व विकासकामे जलद गतीने होतील, अशी माहिती नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी दिली.

सुवेंद्र गांधी यांनी सांगितले की,  या सर्व महामार्गांच्या दृष्टीने नगर शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. रस्त्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करणे, रस्त्याच्या लगत असणार्‍या गावाजवळून बाह्यवळण रस्ता तयार करणे, तसेच रस्त्यावर आवश्यक ठिकाणी छोटे-मोठे पूल तयार करणे आदी महत्त्वाच्या कामांबरोबरच रस्त्यासाठी भूसंपादन करून जमिनीचे  मूल्यांकन करणे, रस्त्यात येणार्‍या विहिरी, झाडे व इतर अडथळे दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कार्यालय नगर शहरामध्ये असणे अत्यावश्यक होते. सदर कार्यालयास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने ते लवकरच सुरु होणार आहे. भारतमाला योजनेंतर्गत जिल्ह्यातून जाणार्‍या सहा महामार्गांच्या 500 किलोमीटरचे काम या कार्यालयामार्फत होणार आहे.