Thu, Jun 27, 2019 01:37होमपेज › Ahamadnagar › नगरसह जिल्ह्यात बंद शांततेत

नगरसह जिल्ह्यात बंद शांततेत

Published On: Jan 04 2018 12:59AM | Last Updated: Jan 03 2018 9:50PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी  

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ काल (दि.3) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला नगर शहरासह जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. जिल्हाभर बंद शांततेत सुरू असताना जामखेड तालुक्यात या बंदला दगडफेकीच्या घटनेमुळे गालबोट लागले. शाळा, महाविद्यालयांसह व्यावासायिकांनी बाजारपेठांतील दुकाने बंद ठेवल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. एसटी महामंडळाने बससेवा बंद ठेवल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. बंदच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मंगळवारी विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीमुळे नगर शहरातील बहुतांशी सर्व बाजारपेठा काल (दि.3) बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले होते. तसेच शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. दलित संघटनांच्या वतीने दुपारी मोर्चा काढून माळीवाडा बसस्थानक चौकात रास्तारोको करण्यात आला. तसेच काही ठिकाणी कार्यकर्ते फिरून सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना दिसत होते. बंदमुळे मार्केटयार्डमधील व्यवहार ठप्प झाले होते. एसटी महामंडळाने बस बंद ठेवल्याने शहरातील तारकपूर, माळीवाडा व पुणे रस्त्यावरील बसस्थानक या तिन्ही ठिकाणी शुकशुकाट होता. बसअभावी प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनुचित घटना टाळण्यासाठी चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे श्‍वान पथकाकडून तपासणी करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र शांततेत सुरू असलेल्या बंदला जामखेड तालुक्यातील जवळा येथे गालबोट लागले.  तेथे एसटी बसवर दगडफेक झाली. त्यामध्ये वाहक किरकोळ जखमी झाला. दूध संघाच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. दूध ओतून देण्यात आले. त्यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जामखेड तालुक्यात विविध ठिकाणीही कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. राहाता, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांतही बंदला प्रतिसाद मिळाला. 

दरम्यान, मंगळवारी (दि.2) नगर शहरातील बसस्थानक चौक ते मार्केटयार्ड परिसरात झालेल्या दगडफेकप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 16 जणांविरोधात पोलिस कर्मचार्‍यास जिवे मारण्यासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील 13 आरोपींना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन असलेल्या तिघांना समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.