होमपेज › Ahamadnagar › जिल्हा वार्षिक योजनांचा  570 कोटींचा आराखडा मंजूर

जिल्हा वार्षिक योजनांचा  570 कोटींचा आराखडा मंजूर

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 11:55PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

आगामी सन 2018-19 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनांसाठी 569 कोटी 86 लाखांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी 29 कोटी 78 लाखांची वाढ करण्यात आली आहे. सन 2017-18 मधील सर्वसाधारण योजनांच्या 1 कोटी 26 लाखांचा निधी पुनर्विनियोजनांद्वारे निंबोडी शाळेसह इतर विकासकामांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.

सन 2018-19 च्या जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना. शिंदे बोलत होते. बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. विजय औटी, आ. संग्राम जगताप, आ. स्नेहलता कोल्हे, आ. राहुल जगताप, जिल्हाधिकारी अभय महाजन, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने,  महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. व्हरसाळे आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2017-18 या आर्थिक वर्षातील मंजूर झालेल्या निधीपैकी 434 कोटी 25 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी 62.42 टक्के निधी वितरित करण्यात आला असून, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्र सरकारचा हिस्सा पूर्णतः प्राप्त न झाल्याने त्या निधीचे वितरण यंत्रणांना करण्यात आलेले नाही. सन 2017- 18 मधील काही कामांवर जास्तीचा खर्च होणार असल्याने, त्यासाठी 82 कोटी 60 लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच 4 योजनांसाठी निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले आहे. त्यात दुर्घटना घडलेल्या निंबोडी शाळेसाठी 75 लाख, संयुक्त वन व्यवस्थापनासाठी 20 लाख, आयटीआय शाळेच्या इमारतीसाठी 6 लाख 70 हजार तर पर्यटन विकासाच्या सुविधांसाठी 25 लाखांचा निधी देण्यात येणार आहे.

सन 2018- 19 च्या प्रारूप आराखड्यात सर्वसाधारण योजनांसाठी 351 कोटी 35 लाख, आदिवासी उपाययोजनांसाठी 78 कोटी 6 लाख, तर अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी 140 कोटी 45 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सन 2018- 19 च्या एकूण निधीपैकी 52 कोटी 70 लाख मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी प्रस्तावित आहेत. ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना 35 कोटी 78 लाख, रस्ते विकास व मजबुतीकरण 22 कोटी 50 लाख, ग्रामीण रस्ते विकास 16 कोटी, मृद संधारणाच्या उपाययोजनेद्वारे जमिनीचा विकास 30 कोटी, वन क्षेत्रात मृद व जलसंधारणाच्या कामांसाठी 19 कोटी 40 लाख, शौचालयांच्या बांधकामासाठी 28 कोटी 23 लाख, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत जनसुविधा विशेष अनुदान व अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी प्रत्येकी 9 कोटी, सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 13 कोटी 78 लाख रूपये, अशी ठळक तरतूद करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.