Wed, Jul 08, 2020 05:09होमपेज › Ahamadnagar › देशपांडे रुग्णालय बंदच्या मार्गावर!

देशपांडे रुग्णालय बंदच्या मार्गावर!

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 11:24PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आवश्यक प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांना सेवा पुरविण्यात मर्यादा आल्या आहेत. प्रसुतीकरिता रुग्णांची संख्या वाढत असतांना एका डॉक्टरांनी राजीनामा दिल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी काही रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागते. अपुर्‍या कर्मचार्‍यांअभावी पूर्ण क्षमतेने रुग्णांवर उपचार होऊ शकत नसल्याने तळ मजल्यावरील जनरल वॉर्ड रुग्णालय प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे चांगली सेवा देणारे रुग्णालय आज बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना देशपांडे रुग्णालयामार्फत सेवा पुरविली जाते. 100 खाटांचे हे रुग्णालय प्रसुती संदर्भातील सेवांसाठी जिल्ह्यात प्रसिध्द आहे. भूलतज्ज्ञांनी बंद केलेले काम सुरू झाल्यापासून प्रसुतिकरिता व सिझेरियन शस्त्रक्रियेकरिता रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा स्थितीत रुग्णालयात 3 स्त्री रोग तज्ज्ञ, 6 वैद्यकीय अधिकारी व 25 परिचारिकांची (कार्यरत 15) आवश्यकता आहे. मात्र, 2 वैद्यकीय अधिकारी व 1 स्त्रीरोग तज्ज्ञ सध्या काम पाहात असून अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज गुंजाळ यांनी 10 दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेला आहे. प्रसुति व शस्त्रक्रियेसाठी डॉ. शिल्पा पाठक या एकच स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध असल्याने प्रसुतीच्या रुग्णांना 24 तास सेवा देणे शक्य नाही. डॉ. गुंजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या प्रसुतीच्या रुग्णांवर सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. इतर वेळेत अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठवावे लागत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांची (आरएमओ) कमरता व परिचारिकांची अपुरी संख्या यामुळे उपलब्ध स्टाफच्या प्रमाणातच रुग्णांची भरती करुन घेण्यात येत आहे. रुग्णायलयाच्या पहिल्या मजल्यावर 30 खाटांची सेवा पुरविण्यात येत असून तळ मजल्यावरील जनरल वॉर्ड बंद करण्यात आल्याचेही वैद्यकीय अधिक्षकांनी स्पष्ट केले आहे. 
रुग्णालयात पूर्ण क्षमतेने सेवा पुरविण्यासाठी आवश्यक पदे भरण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने आस्थापना विभागाकडे मागणी अहवाल सादर केलेला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांकडे एनयुएचएम अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ज्ञ) उपलब्ध करुन देण्याबाबतही मागील महिन्यातच कळविण्यात आले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ व इतर आवश्यक स्टाफ उपलब्ध होईपर्यंत मर्यादीत स्वरुपातच सेवा पुरवावी लागणार असून आवश्यक स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्‍तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, जनरल वॉर्ड बंद करण्यात आल्यामुळे गरजू रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. पदाधिकारी व वरीष्ठ अधिकारी याबाबत दखल घेत नसल्याने देशपांडे रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.