Thu, Jan 30, 2020 00:20होमपेज › Ahamadnagar › दलित संघटनांचा शुक्रवारी मूक मोर्चा

दलित संघटनांचा शुक्रवारी मूक मोर्चा

Published On: Jan 03 2018 1:09AM | Last Updated: Jan 02 2018 11:03PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर उमटलेल्या पडसादाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर काल (दि. 2) दुपारी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली. या बैठकीत परिस्थिती निवळण्यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांततेत राहण्याचे आवाहन केले. दगडफेकीच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या बैठकीत रिपब्लिकनचे नेते अशोक गायकवाड, अजय साळवे, सुनील क्षेत्रे, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे शहरजिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कोरेगाव भीमा येथील घटनेबाबत काय भूमिका घ्यायची, याबाबत चर्चा करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी दलितांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केली. परंतु, दलित रस्त्यावर उतरले, तर जातीय दंगल आणखी भडकून जखमी झालेले व कोरेगाव भीमा येथे गुंतलेले दलित महिला, मुले व पुरुषांना घरी पोहोचता येण्यात अडथळा निर्माण होईल. त्यामुळे शांततेत राहू, असे आवाहन अजय साळवे यांनी उपस्थितांना केले.  दंगेखोर म्हणून काही दलित कुटुंबातील युवकांना अटक करण्यात आली आहे. गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत काहींनी व्यक्त केले. हिंसक मार्ग सोडून शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्याचा निश्‍चय करण्यात आला.