गणेश शेंडगे
नगर : ‘एटीएम’ कार्डवरील माहिती विचारून फोन करणार्या सर्व गुन्ह्यांचे कनेक्शन झारखंड राज्यातील विशिष्ट जिल्ह्यांतमध्येच असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही जिल्हे हे नक्षलप्रभावित आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून दररोज मिळणारे कोट्यवधी रुपये हे नक्षलवादी चळवळीसाठी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खातेदाराला बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून ‘एटीएम’ कार्डवरील माहिती विचारली जाते. आता अनेकांना फसवणुकीचा हा प्रकार माहिती झाल्याने अनेकजण त्यास बळी पडत नाही. परंतु, जे फोन करणार्याच्या गोड बोलण्यास बळी पडून कार्डवरील माहिती देतात, त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यावरील पैसे गायब झालेले असतात.
‘ई-व्हायलेट’च्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी केली जाते. नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा प्रकार सुरू आहे. तसेच देशातील इतर जिल्ह्यांतही हे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यातून दिवसाला कोट्यवधी रुपयांची माया हे सायबर गुन्हेगार गोळा करीत आहेत. नगर जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास करताना सर्व लुटीचे झारखंड राज्याशी कनेक्शन असल्याचे उघड झालेले आहे. यातील दोन जिल्हे हे नक्षलप्रभावित आहेत. पोलिसांचे पथक तांत्रिक पद्धतीने गुन्ह्यांचा तपास करून संबंधित जिल्ह्यांत गेल्यानंतर, तेथे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत स्थानिक पोलिसांकडून योग्य पद्धतीने सहकार्य मिळत नाही. तसेच खोटी माहिती देऊन आरोपींच्या जवळपास पोलिसांचे पथक वेश बदलून गेल्यास, बाहेरील व्यक्ती आल्याचे दिसताच मोठा जमाव पोलिसांभोवती
जमा होतो.
त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यातून सायबर गुन्हेगारी फोफावत चालली आहे. ‘एटीएम’ कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणार्यांचे कनेक्शन हे नक्षल प्रभावित जिल्हे असल्याने नक्षली चळवळीतून हे रॅकेट ऑपरेट केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. नक्षलवाद्यांनी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून सायबर गुन्हेगारी निवडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुटी सुरू असताना झारखंड पोलिस त्याविरोधात ठोस कार्यवाही करताना दिसत नाहीत. परिणामी ही सायबर गुन्हेगारी वाढीस लागल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्हेगारांना विशेष प्रशिक्षण
सायबर फसवणूक करणार्यांनी केलेल्या गुन्ह्याची पद्धत पाहता त्यांना विशेष पद्धतीने प्रशिक्षण देऊन सराईत केले जात असल्याचे पुढे येत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सीमकार्ड खरेदी केले जाते. त्यानंतर बँकेचे खाते तयार केले जाते. फोन केल्यानंतर कशा पद्धतीने संवाद करायचा, त्यानंतर कशा पद्धतीने ऑनलाईन लूट करायची, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. बँकेतील गोपनीय माहिती ‘लिक’ कशी? बर्याचदा फसवणुकीसाठी फोन केल्यानंतर संबंधितास त्याचे खाते असलेल्या बँकेचे नाव सांगितले जाते. खाते नंबरही सांगितला जातो. विशेष म्हणजे ज्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन केला जातो, तो बँक खात्याशी कनेक्ट असतो. बँकेतील ही गोपनीय माहिती ‘लिक’ कशी होती, असा प्रश्न पडतो. बँकेने त्यांची सुरक्षितता वाढविण्याची आवश्यकता आहे.
चार जिल्ह्यातूनच फसवणूक नगर जिल्हा पोलिसांकडे एटीएम कार्डबाबत झालेल्या सायबर गुन्हे तक्रारींच्या चौकशीत केलेल्या तपासात झारखंड राज्यातील जामतारा, देवघर, धुमरी, गिरधी या चार जिल्ह्यांतून एटीएम कार्डची माहिती विचारणारे फोन असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यातील जामतारा व गिरधी हे नक्षलप्रभावित जिल्हे आहेत.
-प्रतिक कोळी (पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे)