Sun, Jun 16, 2019 02:41होमपेज › Ahamadnagar › नगरसेवकांना डबल उमेदवारीची भुरळ!

नगरसेवकांना डबल उमेदवारीची भुरळ!

Published On: Aug 29 2018 1:30AM | Last Updated: Aug 29 2018 12:37AMनगर : प्रतिनिधी

मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या क्लीष्ट प्रभाग रचनेत अनेक जुने प्रभाग दोन, तीन, चार प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत. हक्काचे समजले जाणारे मतदार दोन प्रभागात विभागले गेल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांनी दोन प्रभागातून उमेदवारीची इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांकडून याबाबत चाचपणी सुरु आहे.

प्रभाग रचनेत शहराच्या मध्यवर्ती भागाचे अर्धा डझन तुकडे झाले आहेत. तोफखान्याचा काही भाग थेट महावीरनगरपर्यंत जोडला गेला आहे. तर काही भाग माळीवाडा, सारसनगर (कानडे मळा), आनंदधामपर्यंत, काही भाग सक्कर चौकापर्यंत जोडला गेला आहे. त्यामुळे मध्यवर्ती परिसरातील इच्छुकांसह त्या-त्या भागातील विद्यमान नगरसेवकांच्या अडचणी झाल्या आहेत. परिणामी, काही नगरसेवकांनी दोन प्रभागातून उमेदवारीसाठी चाचपणी सुरु केली आहे. एका प्रभागात स्वतः तर दुसर्‍या प्रभागात ‘सौं’साठी पर्याय शोधला जात आहे.

यात शिवसेनेचे नेते अनिल शिंदे हे स्वतः प्रभाग 15 मधून तर त्यांच्या पत्नी माजी महापौर शीला शिंदे यांना प्रभाग 13 मधून उमेदवारीसाठी चाचपणी सुरु झाली आहे. विद्यमान उपमहापौर अनिल बोरुडे यांना आरक्षणाने संकटात टाकल्यामुळे त्यांच्या ‘होमपीच’वरुन सौभाग्यवतींना उमेदवारी देण्याची तयारी त्यांनी केली आहे. तर त्यांना प्रभाग 13 मध्ये भाजपाचे किशोर डागवाले यांच्या विरोधात उतविण्याचा विचार शिवसेनेने सुरु केला आहे. दुसरीकडे डागवाले यांनी प्रभाग 13 मधून स्वतःच्या उमेदवारीची तयारी करतांनाच प्रभाग 8 मधून पत्नीच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरु केली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे समर्थक माजी नगरसेवक संजय चोपडा यांनीही प्रभाग 14 व प्रभाग 12 मधून उमेदवारीसाठी तयारी सुरु केली आहे. एका प्रभागात ते स्वतः तर दुसर्‍या प्रभागातून पत्नीला रिंगणात उतरविण्याचा त्यांचा विचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आरिफ शेख यांचा प्रभाग दोन प्रभागात विभागला गेल्यामुळे त्यांनीही दोन प्रभागांतून उमेदवारीसाठी चाचपणी सुरु केली आहे. प्रभाग 10 सह प्रभाग 9 च्या पर्यायाचीही त्यांनी तयारी ठेवली आहे. 

प्रारुप प्रभाग रचनेबाबतचा संभ्रम दूर झाल्यानंतर तसेच मतदार याद्या तयार झाल्यानंतर प्रभागाचा नेमका अंदाज येणार असल्याने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत अनेकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. काहींना मात्र, डबल उमेदवारीची भुरळ पडली असून, त्यांनी सोशल मीडियातून तसा प्रचारही सुरु केला आहे.