Thu, Mar 21, 2019 15:29होमपेज › Ahamadnagar › बीएलओंवर होणार गुन्हे दाखल

बीएलओंवर होणार गुन्हे दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

मतदार नोंदणी कामात हलगर्जीपणा करणार्‍या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी तसेच काम करणार्‍या शिक्षकांना भडकावून राष्ट्रीय मतदार पुनरिक्षण कामापासून परावृत्त करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यानुसार पाथर्डी तालुक्यातील तीन शिक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत.दरम्यान, पारनेर तालुक्यातील सर्वच 359 बीएलओंनी कामावर बहिष्कार टाकला आहे. हा बहिष्कार कायम ठेवणार्‍या संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाने जिल्हाभरातील बीएलओंचे धाबे दणाणले आहे. 

जिल्हाभरात सध्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम सुरु आहे.  या कार्यक्रमांतर्गत दि.30 नोव्हेंबर2017 पर्यंत बीएलओंना घरोघरी जावून, मतदारांची माहिती संकलीत करण्याचे बंधनकारक केले आहे. या कामात हलगर्जीपणा करणार्‍या बीएलओंवर तसेच त्यांना काम न करण्यास प्रवृत्त करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार काम न करणार्‍या केंद्रस्तरीय अधिका र्‍यांवर जळगाव जिल्ह्यातील धारणगावच्या तहसीलदारांनी लोकप्रतिनिधी कायदा 1950 चे कलम 32 नुसार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. याच धर्तीवर कामचुकार करणार्‍या बीएलओंवर कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाभरात कारवाई सुरु आहे.

पाथर्डी तालुक्यातील बीएलओंची बैठक शुक्रवारी (दि.24) तहसील कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत डोंगरवाडी येथील कल्याण लवांडे या शिक्षक पदाधिकार्‍यासह  सुसरे येथील महादेव आव्हाड व शिरापूर येथील आसाराम शिंदे या तीनही शिक्षकांनी मतदार नोंदणीचे काम न करण्याचे तसेच मतदार केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्तीचा आदेश रदृ केला जावा, असे निवेदन तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले. या शिक्षकांनी प्रक्षोभक मुदृे पुढे करुन, इतर काम करणार्‍या शिक्षकांना भडकावून, राष्ट्रीय मतदार पुनरिक्षण कामापासून परावृत्त केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या तीन शिक्षकांना  लोकप्रतिनिधीत्व  अधिनियम 1951 चे कलम 134 व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 32 नुसार कार्यवाही का करु नयेत, अशा नोटिसा तहसीलदार पाटील यांनी कल्याण लवांडे, महादेव आव्हाड व आसाराम शिंदे या तीन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना बजावल्या आहेत. 

पारनेर तालुक्यातील सर्वच 359 बीएलओंनी देखील या कामावर बहिष्कार टाकला आहे. या बीएलओंनी बहिष्कार कायम ठेवल्यास, सोमवारी (दि.27) दुपारी तीन वाजेनंतर गुन्हे दाखल केले जातील, अशा नोटीसा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गोविंद दाणेज यांनी सर्वच बीएलओंना दिल्या आहेत. अशाच नोटिसा संगमनेर, कोपरगाव तालुक्यांतील बीएलओंना देण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. या नोटिसामुळे जिल्हाभरातील बीएलओंमध्ये खळबळ उडाली आहे.