Fri, Apr 26, 2019 18:18होमपेज › Ahamadnagar › व्यापार्‍यास लुटणारी टोळी जेरबंद

व्यापार्‍यास लुटणारी टोळी जेरबंद

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:33PMनगर : प्रतिनिधी

व्यापार्‍यांना रस्त्यात अडवून लुटणारी 5 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी पकडली. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम, दोन कार, एक दुचाकी असा 24 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीच्या म्होरक्याचा शोध सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अटक केलेल्यांमध्ये हेमंत किशोर वाघ (28, रा. एकनाथनगर, केडगाव), शहाबाज रहेमान शेख (22, रा. भातोडी पारगाव, ता. नगर), विशाल बाळासाहेब राहिंज (24, रा. संभाजी चौक, केडगाव), सुमीत सुभाष कोतकर (25, रा. केडगाव देवी मंदिराजवळ, केडगाव), ऋषिकेश नरेंद्र परदेशी (20, रा. संभाजीनगर, मराठी शाळेजवळ, शिवाजीनगर, केडगाव) यांचा समावेश आहे.

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन हे एका राजकीय पक्षाच्या केडगाव येथील विभागप्रमुखाचे आहे. त्याचीही चौकशी करण्यात आली. परंतु, त्याचा थेट सहभाग आढळून आलेला नसल्याने, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. शिवाजी गायके (रा. प्रवरासंगम, ता. नेवासा) हे 10 वर्षांपासून प्रवरासंगम येथील व्यापारी अमोल ललवाणी यांच्याकडे चालक म्हणून नोकरी करतात. सध्या त्यांचे मित्र संदेश फिरोदिया यांच्याकडे ते नोकरी करतात. फिरोदिया हे भुसार मालाचे व्यापारी आहेत. शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजता या दोघांच्या सांगण्यावरून गायके हे ख्रिस्तगल्ली येथील एकाकडून 9 लाख 88 हजार रुपये घेऊन प्रवरासंगमकडे जात होते. नगरपासून काही जण कारमधून त्यांचा पाठलाग करीत होते. हे गायके यांच्या लक्षात आले नाही. रात्रीआठ वाजता पांढरीपूल ते घोडेगाव दरम्यान गायके यांची कार अडवून पाठलाग करणार्‍यांनी पैशाची बॅग व मोबाईल हॅण्डसेट काढून घेतले होते.

या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना खबर्‍याकडून गोपनीय माहिती मिळाल्यावरून वेगवेगळ्या ठिकाणाहून 5 जणांना पकडण्यात आले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी पांढरीपूल-घोडेगाव दरम्यानच्या लुटीसह राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत युनूस शेख यांचे पावणेसात लाख रुपये व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण परिसरातून सुरेश दुबाले यांना सुमारे दोन लाख रुपयांना लुटल्याची कबुली दिली. ही टोळी पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागली असून, त्यांच्याकडून 19 लाख रुपये लुटल्याचे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून 3 लाख 49 हजार रुपये, झायलो कार, आय 20 कार, एक दुचाकी व 8 मोबाईल हॅण्डसेट हस्तगत केले आहेत.

यातील आरोपी ऋषिकेश परदेशी हा नगर-कल्याण रस्त्यावरील हॉटेल सम्राट येथे व्यवस्थापक म्हणून नोकरी करीत होता. त्या हॉटेल मालकाची गाडी त्याने गुन्हा करताना वापरली होती. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सहाय्यक निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, कर्मचारी उमेश खेडकर, सोन्याबापू नानेकर, भाऊसाहेब काळे, दीपक शिंदे, सोनटक्के, मनोज गोसावी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास सोनई पोलिस ठाण्याकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.