Sat, Mar 23, 2019 12:05होमपेज › Ahamadnagar › रांजणीच्या सरपंचास भोवणार शौचालय

रांजणीच्या सरपंचास भोवणार शौचालय

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 14 2017 12:44AM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

तालुक्यातील रांजणी येथील सरपंच व चार सदस्यांचे पद धोक्यात आले आहे.  शौचालये बांधून पूर्ण झाले नसतानाही बोगस प्रमाणपत्र सादर करुन ग्रामपंचायतीवर निवडून आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यामार्फत सखोल चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यमान सरपंचासह पाच पदाधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. रांजणी ग्रामपंचायतीची ऑक्टोबर महिन्यात निवडणूक झाली. सरपंच व सदस्यपदाची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी शौचालयाचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 12 उमेदवारांनी शौचालय अस्तित्वात नसताना शौचालय असल्याचे व ते नियमितपणे त्याचा वापर करीत असल्याचे बोगस प्रमाणपत्र ग्रामसेवकाने दिले.

या प्रमाणपत्रावरच उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. त्यापैकी सरपंचपदी बाळासाहेब चेमटे, सदस्यपदी सर्वश्री विजय लिपणे, छायाबाई भेंडेकर, कमलाबाई थोरात व अमोल ठोंबे हे निवडून आले आहेत, अशी तक्रार दिलीप झिपुर्डे यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदन त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील दिले आहे.. बोगस प्रमाणपत्र जोडून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे सदस्यत्व रदृ करुन फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिलेआहेत.  त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी गटविकास अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.