Tue, Nov 19, 2019 10:18होमपेज › Ahamadnagar › भूखंडावरून भूतकर-बानकर वादाची ठिणगी

भूखंडावरून भूतकर-बानकर वादाची ठिणगी

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 11:53PM

बुकमार्क करा

 नगर : गणेश शेंडगे

शनीशिंगणापुरातील एक एकराच्या भूखंडावरून गणेश भूतकर आणि अविनाश बानकर या मित्रांत सुमारे अडीच-तीन वर्षांपूर्वी वादाची ठिणगी पेटली. त्या ठिणगीत सोबत्यांनी तेल ओतण्याचे काम केले व त्याचे रुपांतर क्रोधाच्या आगीत झाले. बुधवारचा तो क्षण निमित्त ठरला व एकेकाळच्या जिवाभावाच्या मित्रानेच मित्राचा जीव घेतला. 

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश भूतकर व अविनाश बानकर हे दोघे चांगले मित्र होते. अगदी जिवाभावाचे म्हणता येतील तसे. त्यामुळे दोघांने अनेक व्यवसाय भागीदारीत होते व प्रॉपर्टीही भागीदारीत खरेदी केली. व्यावसायिकेतून गुन्हे करायला लागलेल्या या जोडीगोळीची मैत्री अजिबात कमी होत नव्हती. परंतु, त्यांच्या मैत्रीचा नजर लागली. मोक्याच्या जागेवरील भूखंडाच्या वादाने त्यांच्यात वैमनस्याची बिजे रोवली गेली. काही वर्षांपूर्वी शनीशिंगणापूर येथील मोक्याच्या जागेवरील एक एकराचा भूखंड कमी किंमतीत भूतकर व बानकर याने भागीदारीत घेतला. त्याचे खरेदीखत बानकर याच्या नावावर करण्यात आले. यातील अर्धा भूखंड नावावर करून द्यावा, यासाठी भूतकर याने बानकर याच्याकडे तगादा सुरू केला होता. बानकर हा भूखंड नावावर करून द्यायला तयार नव्हता. परिणामी त्यांच्यातील वाद वाढू लागला. सोबत्यांनी त्यात तेल घालून वाद वाढविण्याचे काम केले. 

अखेर दोघांचा वाद विकोपाला गेल्यानंतर नेवासा तालुक्यातील एका राजकीय व्यक्तीकडे समझोत्यासाठी गेला. त्यांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत बानकर याने भूतकर याला 20 लाख रुपये द्यावेत व मालकीहक्क बानकर याच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत समझोत्यानुसार बानकर याने भूतकर याला पैसे दिले. पैसे देऊन मोक्याचा भूखंड बानकर याने स्वतःकडे ठेवल्यापासून भूतकरसोबतच वैमन्य वाढले. सोबती त्यांच्यातील वादात अधूनमधून किरकोळ कारणातूनही व्यवस्थितरित्या तेल घालत होते. 

शनीशिंगणापूरात त्यांचे अनेक व्यवसाय भागीदारीतून सुरू होते. भूतकर अनेकदा दारुच्या नशेत त्यांचा व्यवसाय सांभाळणार्‍या युवकांना मारहाण करून दमदाटी करीत होता. वाद मिटण्याची चिन्हे नव्हती. तो वाढतच चालला होता. भूतकर व बानकर हे एकमेकांशी नेहमी बोलायचे. खुनाच्या आदल्या  दिवशीही त्यांच्यात चांगला संवाद झाला होता. सोबत्यांनी एकमेकांबद्दल गैरसमज वाढवून दिल्याने वादाची ठिणगी क्रोधाच्या आगीत रुपांतरीत झाली. त्यातून भूतकर हा ‘तुमचा काटा काढणार आहे’, असे निरोप बानकर याला दिले जावू लागले. त्यातून संतापाचा उद्रेकही वाढतच गेला. 

बुधवारी (दि. 20) बानकर हा नगरला येत होता. त्यावेळी एका विश्‍वासू व्यक्तीने बानकर याला संपर्क करून ‘सावध रहा. भूतकर काटा काढणार आहे’, असे निरोप दिला. यावेळच्या निरोपाने बानकर याचा संताप अनावर झाला. त्याने पुन्हा शनीशिंगणापूर गाठले. विश्‍वासू जोडीदारांना सोबत घेऊन एका ठिकाणी बैठक घेतली. या बैठकीत गणेश भूतकरचा आजच काटा काढायचा, असा निश्‍चय झाला. दुचाकीवरून काहींनी भूतकर याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तो हॉटेलवर येत असल्याचे समजताच बानकर याला निरोप दिला. ‘स्कॉर्पिओ’मधून बानकर हा त्याच्या काही विश्‍वासू जोडीदारांसोबत आला. त्याने भूतकरवर थेट हल्ला केला. काही जण वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, क्रोधाच्या आगीच समझोत्याला जागा नव्हती. संतापलेल्या बानकर याने कुर्‍हाडीचा जोरदार प्रहार भूतकर याच्यावर घातला व तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. काही वेळताच गतप्राण झाला व जिवाभावाच्या मित्रानेच जीव घेतल्याची चर्चा सुरू झाली.