Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Ahamadnagar › सरकारी पक्ष करणार अपिल : एसपी शर्मा

सरकारी पक्ष करणार अपिल : एसपी शर्मा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

खर्डा येथील नितीन आगे या दलित कुटुंबातील युवकाच्या खून प्रकरणाचे निकालपत्र न्यायालयातून प्राप्त झाल्यानंतर विधिज्ञांचा सल्ला घेऊन सरकारी पक्षाकडून अपील करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकतेच या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. 

नितीन आगे या युवकाची प्रेमप्रकरणाच्या संशयावरून गावातून धिंड काढून झाडाला गळफास देऊन हत्या करण्यात आली, अशी फिर्याद मयताच्या वडिलांनी पोलिसांत दिली होती. सन 2014 रोजी झालेल्या या घटनेनंतर राज्यभरातील दलित संघटना आक्रमक झाल्या होत्या. गुरुवारी (दि. 23) जिल्हा व सत्र न्यायालयाने या गुन्ह्यातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. त्यामुळे पुन्हा दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत.

याबाबत बोलताना अधीक्षक शर्मा म्हणाले की, या प्रकरणात पोलिस प्रशासनाकडून अपील करण्यात येणार आहे. निकालपत्राची प्रत अद्याप मिळालेली नाही. निकालपत्र प्राप्त होताच याबाबत सरकारी वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेऊन नेमके कशामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही, याची माहिती घेतली जाईल. उणिवांचा अभ्यास केल्यानंतर विधी व न्याय खात्याकडे या प्रकरणाचे अपील करण्याबाबत प्रस्ताव पाठविला जाईल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी पक्षाकडून अपील करण्यात येणार आहे.