Sun, Mar 24, 2019 23:28
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › मंदिरांवरील कारवाईविरोधात सहकार्य

मंदिरांवरील कारवाईविरोधात सहकार्य

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 14 2017 12:47AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

महापालिकेने मंदिरे पाडण्याच्या सुरू केलेल्या कारवाई विरोधात गरज भासल्यास नगरला येऊन सभा घेऊ. तसेच उच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाईसाठीही कृती समितीला सहकार्य करण्याचे आश्‍वासन खा. चंद्रकांत खैरे यांनी दिले.

मंदिर बचाव कृती समितीने खा. खैरे यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन नगरच्या मंदिरांवर होणार्‍या कारवाईबाबत लक्ष घालण्याबाबत निवेदन निमंत्रक वसंत लोढा व याचिकाकर्ते संजय वल्लाकट्टी यांनी दिले. यावेळी माजी सभागृहनेते अनिल शिंदे, श्रीशिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब ठाणगे, राजकुमार जोशी, सदाभाऊ शिंदे, गौतम कराळे,औरंगाबादचे मंदिर बचाव कृती समितीचे निमंत्रक मोहन जोशी आदी उपस्थित होते. यावेळी लोढा यांनी नगर महापालिकेने केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे आतापर्यंत 17 मंदिरे पाडली गल्याचे सांगत, शहरातील मंदिरे वाचविण्यासाठी मंदिर बचाव कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेची माहिती दिली. खा.खैरे यांनी नगरमध्ये सभा घेऊन औरंगाबादप्रमाणे मंदिरे वाचविण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

यावेळी खा. खैरे म्हणाले, नगरसारख्या ऐतिहासिक शहरात हिंदूंची 17 मंदिरे पडतात आणि कोणीही आवाज उठवत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. औरंगाबादमध्ये महापालिकेने 1200 धार्मिक स्थळांची यादी तयार करुन पाडण्यास सुरू केलेल्या कारवाईला पूर्ण ताकदीनिशी विरोध करत कारवाई थांबविण्यास भाग पाडले. महापालिकेला महासभा घेऊन अ,ब,क, अशी धार्मिकस्थळांची वर्गवारी करायला लावली. यामध्ये जी धार्मिकस्थळे वाहतुकीला अडथळा नाही, तसेच सर्वात जास्त लोकमानस आहे, अशी मंदिरे वगळायला लावली. त्याचबरोबर जी धार्मिकस्थळे वाहतुकीला अथडळा ठरत आहेत, ती सामोपचाराने स्थानिक लोकांना बरोबर घेऊन इतरत्र खासगी जागेत स्थलांतरीत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे 1200 पैकी केवळ 5 धार्मिक स्थळांवर पाडण्याची कारवाई करावी लागली. बाकी सर्व मंदिरे व धार्मिकस्थळे वाचविली आहेत.

नगरमध्येही याच पद्धतीने अ,ब,क अशी वर्गवारी करण्यासाठी महापालिकेने महासभेचे आयोजन करावे. तसेच जी मंदिरे ओपनस्पेसमध्ये ती अधिकृत करण्यासाठीही मनपात ठराव मांडावा, अशी सूचना त्यांनी नगरसेवक अनिल शिंदे यांना केली. मंदिरे वाचविण्यासाठी कृती समितीला सहकार्य करू. हा काही राजकीय प्रश्‍न नाही, तर हिंदूंचा धार्मिक विषय आहे. गरज भासल्यास नगरला येऊन सभा घेऊ. उच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाईसाठीही कृती समितीला सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

यावेळी याचिकाकर्ते संजय वल्लाकट्टी यांनी मंदिर बचाव कृती समितीने औरंगाबाद उच्च न्यायालयात महापालिकेच्या चुकीच्या सर्र्वेेक्षणाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेबद्दल माहिती देऊन कागदपत्रे सादर केली.  यावेळी खा. खैरे यांचे उच्च न्यायायातील वरिष्ठ वकील अ‍ॅड.संदीप राजेभोसले यांना पाचारण करुन समितीला मार्गदर्शन करण्यास सांगितले. यावेळी समितीचे अ‍ॅड.पंकज खराडे, अ‍ॅड. संदीप आंधळे यांनी चर्चेत भाग घेतला.