Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Ahamadnagar › स्वेच्छा निधीची तरतूद खुली होणार!

स्वेच्छा निधीची तरतूद खुली होणार!

Published On: Aug 15 2018 1:22AM | Last Updated: Aug 15 2018 1:22AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या अंदाजपत्रकातील नगरसेवक स्वेच्छा निधीची 100 टक्के तरतूद खुली करण्यास प्रभारी आयुक्तांनी तयारी दर्शविल्याची माहिती सभागृह नेते गणेश कवडे यांनी दिली. पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत 1200 चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवान्याचे अधिकार उपायुक्तांकडे वर्ग करण्याचा निर्णय झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रशासनाच्या संथगतीने सुरु असलेल्या कामकाजामुळे विविध विभागांसह घनकचरा विभागाच्या प्रलंबित असलेल्या निविदा प्रक्रिया, बजेट तरतुदी खुल्या करणे, सौभाग्य सदनची प्रलंबित असलेली निविदा मंजूर करणे, बेग पटांगण येथील उद्यानाचा प्रस्ताव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे पुतळे उभारण्याचा प्रस्ताव, सावेडी स्मशानभूमी, मंगलगेट मटन मार्केटचे नुतनीकरण, दलित वस्ती, दलितेतर वस्ती निधीतील प्रलंबित असलेले प्रस्ताव, 147 कोटींच्या नगरोत्थानच्या डीपीआरच्या तांत्रिक मान्यतेसाठी पाठपुरावा करणे आदी विविध विषयांवर महापौर सुरेखा कदम यांनी संयुक्त बैठक बोलावली होती. यावेळी प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी, सभापती बाबासाहेब वाकळे, उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक संजय शेंडगे, दिलीप सातपुते आदींसह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नगरसेवक स्वेच्छा निधीची 100 टक्के तरतूद खुली करण्यास आयुक्तांनी तयारी दर्शविली आहे. अंदाजपत्रकातील इतर तरतुदी मात्र तूर्तास खुल्या करण्यास त्यांनी नकार दर्शविला आहे. मोबाईल टॉवर लेखाशीर्षाबाबत महासभेच्या अधिकारासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया मार्गी लावण्यात जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात असल्यची तक्रार पदाधिकार्‍यांनी केली. बांधकामाचे परवाने देण्याचे प्रस्ताव रखडल्याकडे सभापती वाकळे यांनी लक्ष वेधल्यानंतर 1200 चौरस मीटरपर्यंतचे अधिकार उपायुक्तांकडे वर्ग करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्तांनी घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापौरांच्या प्रभागातील सौभाग्य सदनचा विषय मात्र पुन्हा चर्चा करु असे सांगत आयुक्तांनी प्रलंबित ठेवला आहे.