Sat, Mar 23, 2019 02:44होमपेज › Ahamadnagar › कमी पटसंख्येच्या ४० शाळा ‘रडार’वर

कमी पटसंख्येच्या ४० शाळा ‘रडार’वर

Published On: Dec 03 2017 1:10AM | Last Updated: Dec 02 2017 11:30PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणार्‍या 49 प्राथमिक शाळा शिक्षण संचालनालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आल्या आहेत. कमी पटसंख्येचे कारण सांगून बंद करण्यात आलेल्या 49 शाळांनंतर कमी पटसंख्येच्या 40 शाळा शिक्षण विभागाच्या ‘रडार’वर असल्याचे कळते. बंद केलेल्या 49 शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा चालवित असलेल्या शाळांपैकी पटसंख्या कमी असणार्‍या तसेच शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेल्या राज्यातील तेराशे प्राथमिक शाळा बंद करण्याचा इशारा राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी नुकताच नगरमध्ये एका कार्यशाळेत दिला होता. शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी शाळा बंद करण्याची कारवाई केली़. पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे़.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शाळा बंद करण्याचा आदेश संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना दिला आहे. aजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील माहितीनुसार जिल्ह्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 89 शाळा आहेत. त्यापैकी 49 शाळांवर गंडांतर आले असून, 40 शाळा ‘वेटिंग लिस्ट’मध्ये आहेत. पटसंख्या कमी असलेल्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षकांना कळविण्यात येते. मात्र हा विषय गंभीरपणे न घेतल्याने पटसंख्या खालावत चालल्याचे दिसते. 49 शाळा बंद केल्याने उर्वरित 40 शाळांनाही धोक्याची घंटा ठरणार आहे.