Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Ahamadnagar › आगे कुटुंबीयांना पाच एकर शेतजमीन

आगे कुटुंबीयांना पाच एकर शेतजमीन

Published On: Jan 01 2018 1:52AM | Last Updated: Dec 31 2017 10:45PM

बुकमार्क करा
नगर ः प्रतिनिधी

खर्डा येथील हत्या झालेल्या नितीन आगे यांच्या कुटुंबाचे लवकरच  पुनर्वसन केले जाणार आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी पाच एकर शेतजमीन  आणि राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांना पत्रही देण्यात आले आहे. सहा महिन्यांनंतर नितीन आगे यांच्या बहिणीला सामाजिक न्याय विभागात सामावून घेतले जाईल, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काल (दि. 31) पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

त्यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील  सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना बडोले म्हणाले की, राजू यांच्या संरक्षणासाठी सध्या एक पोलिस कर्मचारी तैनात केलेला आहे. आणखी एक पोलिस नियुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. नोकरीसाठी मयत नितीन आगेच्या बहिणीचे वय कमी आहे. सहा महिन्यांनंतर नोकरी देण्यात येईल. नितीन आगे खून खटल्यातील साक्षीदार फितूर झाले आहेत. या साक्षीदारांचे समुपदेशन केले जाणार आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत खून खटल्याच्या तपासणीत कुचराई झाली असल्यास संबंधितांवर निश्‍चित कारवाई केली जाणार आहे. त्याबाबत संबंधितांना सूचना देखील दिल्या असल्याचे ना. बडोले यांनी सांगितले.  

...अन् ना.बडोले भडकले

सामाजिक न्याय मंत्री बडोले नगरला आले असता, पोलिस प्रशासनावर चांगलेच भडकलेले दिसत होते. दूरध्वनीवरुन जिल्हा प्रमुखांशी बोलताना ते म्हणाले की, ‘मी राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. असे असताना देखील साधा सहाय्यक पोलिस निरीक्षक तोही गुप्तचर विभागाचा पाठविला. कॅबिनेट मंत्र्यांना काही पत आहे की नाही.’
 

पंधरा दिवसांत शिष्यवृत्ती

अनुसूचित जाती प्रवर्गातील 13 हजार 36 विद्यार्थ्यांची गेल्या वर्षीची शिष्यवृत्ती अदा केली आहे. इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती दिली जात आहे. केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला नाही. तरीही येत्या 15 दिवसांत 3,427 ओबीसी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती अदा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.