Sat, Apr 20, 2019 18:03होमपेज › Ahamadnagar › शिक्षकांचे पगार रखडले!

शिक्षकांचे पगार रखडले!

Published On: Aug 19 2018 1:27AM | Last Updated: Aug 19 2018 12:25AMनगर : प्रतिनिधी

ऑगस्ट महिना उजाडला तरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे जून व जुलै महिन्याचे पगार झालेले नाहीत. पगार रखडल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने पगार लवकर काढण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन दिले.

निवेदनावर आबासाहेब जगताप, रा.या. औटी, संजय शेळके, राजेंद्र शिंदे, राजेंद्र निमसे, संजय धामणे, नवनाथ आडसूळ, सूनिल जाधव, आबा लोंढे, बापू तांबेे, राजेंद्र ठोकळ, सुभाष तांबे, एल .पी. नरसाळे, रविंद्र पिंपळे, दत्तात्रय जपे, बाळासाहेब जाधव, बाजीरााव मोढवे, वृषाली कडलग, बेबीताई तोडमल आदींच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, जून व जुलै या दोन महिन्यांचे पगार आजपर्यंत झाले नाहीत. जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने शिक्षकांच्या पाल्याचे नवीन प्रवेश, वार्षिक फी, शैक्षणिक साहित्य खरेदी, गणवेश खरेदी यासाठी शिक्षकांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. शिक्षकांना समाजापुढे हात पसरावे लागले. एकंदरित गेल्या अडीच महिन्यांपासून पगार न झाल्याने शिक्षकांची सामाजिक अप्रतिष्ठा व आर्थिक कुचंबना झाली आहे. आता 4 सप्टेंबरपर्यंत जून, जुलै व ऑगस्ट या तीनही महिन्यांचे पगार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रत्येकवेळी पगाराच्या विलंबाबत संघटनेने प्रशासनाकडे प्रश्‍न उपस्थित केल्यावर प्रशासन संघटनांबरोबर चर्चा करते व यापुढे असे होणार नाही असे आश्‍वासन मिळते. मात्र गेले वर्षानुवर्षे याबाबत काहीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. या बाबीमुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शिक्षकांकडून प्रत्येक काम तत्परतेने होण्याची प्रशासनाकडून अपेक्षा केली जाते व शिक्षक ते करतातही. पगार मात्र वेळेवर का होत नाही हे समजत नाही. पगार वेळेवर होण्यासाठी संघटनांनी यापूर्वी अनेक उपाय सुचवले परंतु त्याची यत्कींचितही अंमलबजावणी होताना दिसली नाही.

प्रलंबित दोन महिन्यांचे पगार तत्काळ व ऑगस्ट महिन्याचा पगार 5 सप्टेंबरच्या आत करण्यासाठी तसेच यापुढे प्रत्येक महिन्याचा पगार 5 तारखेच्या आत होण्यासाठी आपण आपल्या वेतनव्यवस्थेत सुसूत्रता आणावी. या गोष्टी न झाल्यास जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही 5 सप्टेबर या शिक्षकदिनी आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणार आहोत. तसेच कार्यक्रमस्थळाबाहेर मूक धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.