Sun, May 19, 2019 14:26
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › शिक्षक पुरस्कारावरून अध्यक्षा चिडल्या

शिक्षक पुरस्कारावरून अध्यक्षा चिडल्या

Published On: Sep 12 2018 1:46AM | Last Updated: Sep 12 2018 12:31AMनगर : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या निवडीवरून सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. सदस्या दीपाली गिरमकर व सुनील गडाख यांनी पुरस्कारांसाठी केलेल्या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने अध्यक्षा शालिनी विखे चांगल्याच चिडल्या होत्या. ‘सर्व निवडी योग्य रीतीने केल्या असून, सभा संपल्यावर तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला सर्व कागदपत्र दाखवते’, असे म्हणत त्यांनी गिरमकर यांना शांत केले.

सभेत सदस्य सुनील गडाख यांनी शिक्षक पुरस्कार निवडीचा विषय उपस्थित केला. जिल्हा शिक्षक पुरस्कार निवडीचे निकष काय? त्यासाठी कुठल्या शासन निर्णयांचा आधार घेतला जातो? अशा प्रश्‍नांची सरबत्ती गडाख यांनी शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्यावर केली. शिक्षकांची निवड करतांना शिक्षक संघटनांच्या दबावाला बळी पडत गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकार्‍यांनी पुरस्कारासाठी शिक्षकांच्या नावांची यादी जिल्हा परिषदेला पाठविली. शिक्षकांची परीक्षा घेण्याबाबत कुठलाही शासन निर्णय, आदेश नसतांना परीक्षा घेण्यात आली. या निवड प्रक्रियेत घोळ असून, पुरस्कार रद्द करण्याची मागणी गडाख यांनी केली.

हाच धागा पकडून सदस्या गिरमकर यांनी काही सवाल उपस्थित केले. श्रीगोंदा तालुक्यात एक शिक्षक परीक्षेसाठी गैरहजर असतांना त्याची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. परीक्षा जर सर्वांना देणे बंधनकारक होते तर, त्या शिक्षकाला त्यात सूट का देण्यात आली? इतर शिक्षक पात्र असतांना त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप गिरमकर यांनी केला. या आरोपावर अध्यक्षा विखे संतप्त झाल्या. ‘शिक्षकांचे सामान्य ज्ञान तपासण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. पुरस्कारासाठी सर्व प्रक्रिया योग्य झाली असून, सभा संपल्यावर तुम्हाला सर्व कागदपत्रे दाखवते’ असे म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली. गिरमकर बोलत असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे काही सदस्य त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. भाजपच्या सदस्य असूनही गिरमकर यांच्या बाजूने भाजपचे कुणीही बोलले नाही. भाजप गटनेत्यांनी ‘शेतकरी व गोपालक पुरस्कारासाठीही आता परीक्षा घ्या’ असा खोचक सल्ला दिला. त्यावर विखे यांनी ‘परीक्षा कशासाठी घ्यायची हे आम्हाला चांगले कळते’, असे म्हणत गटनेत्यांना गप्प केले.