Thu, Jul 18, 2019 05:52होमपेज › Ahamadnagar › ‘जय जिजाऊ...जय शिवराय’चा जयघोष

‘जय जिजाऊ...जय शिवराय’चा जयघोष

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 12:04AMनगर : प्रतिनिधी

‘जय जिजाऊ..जय शिवराय.., छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो..’ अशा घोषणा देत नगर शहरातून सकाळी पारंपारिक वाद्यांत शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील शाळा, विद्यालये, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सायंकाळी एका प्रतिष्ठानने ‘डीजे’च्या दणदणाटात मिरवणूक काढली. सकाळी 8 वाजता माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपतींच्या प्रतिमेची विधीवत पूजा करण्यात आली.

त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी महापौर सुरेखा कदम, माजी आमदार नंदकुमार झावरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, शिवप्रहारचे अध्यक्ष संजीव भोर आदी उपस्थित होते.  मिरवणुकीत जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेतील न्यू आर्टस महाविद्यालय, रेसिडेन्शीअल हायस्कूल, न्यू लॉ कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र बालक मंदीर या शिक्षण संस्थांसोबत शिवप्रहार संघटनाही सहभागी झाली होती.

ही मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरातच निघाली. झांज, लेझीम, ढोल पथकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे, वारकरी यांच्या वेशभूषाही काही विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या. शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली रथ आकर्षक फुलांनी सजविले होते. युवक हातात भगवे झेंडे घेऊन ते ढोलच्या तालावर आकाशाच्या दिशेने फिरवत होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली मिरवणूक जिल्हा परिषद समोरील रस्त्याने माळीवाडा वेस, पारशा खुंट, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्ली दरवाजा, निलक्रांती चौक, पोलिस मुख्यालय, चौथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील रेसिडेन्शीअल हायस्कूलच्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप झाला. 

सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पैलवान प्रतिष्ठानने मिरवणूक काढली. या मिरवणुकीत ‘डीजे’चा दणदणाट सुरू असलेल्या गाण्यांवर तरुणाई थिरकत होती. तसेच सावेडी व केडगाव उपनगरातूनही शिवभक्तांनी स्वतंत्र मिरवणुका काढल्या होत्या. दिवसभर शहरातील विविध चौकांत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवचरित्रावरील आधारीत गाणी व पोवाडे ध्वनीक्षेपकावर सुरू होते. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते.