Tue, Nov 13, 2018 04:03



होमपेज › Ahamadnagar › एसटी, खासगी वाहने, दुकानांवर दगडफेक

एसटी, खासगी वाहने, दुकानांवर दगडफेक

Published On: Jan 03 2018 1:09AM | Last Updated: Jan 02 2018 10:42PM

बुकमार्क करा




नगर : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या घटनेचे नगर जिल्ह्यात मंगळवारी (दि. 2) काही प्रमाणात पडसाद उमटले. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात एसटी बस, खासगी वाहने, दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तसेच काही ठिकाणी मोर्चे काढून, रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. अस्तगाव व कोपरगाव येथे दगडफेकीत दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दगडफेक करणार्‍या संशयितांची धरपकड सुरू केली आहे. 

घटनेची गांभीर्य ओळखून बाहेरून राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, नाशिक परिक्षेत्रातून 15 दंगल नियंत्रण पथके, अशी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक हजार पोलिसांना सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. इतर काही अधिकारी व कर्मचारी आरोपींच्या शोधात आहेत. सोमवारी (दि. 1) कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर एक जखमी युवक भिंगारला आल्यानंतर तणाव निर्माण होऊ लागला. भिंगारमधील दुकाने अनेक व्यावसायिकांनी बंद केली. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील नीलक्रांती चौकात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. रात्रीपासूनच सोशल मीडियावरून वेगवेगळे संदेश व्हायरल होऊ लागले. त्यामध्ये अफवांचाही भरणा होता.

मंगळवारी (दि.2) सकाळी नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक येथे काही युवकांचा जमाव गोळा झाला. जमावातील युवकांनी बसस्थानकात उभ्या असलेल्या 10-12 एसटी बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्या. तसेच बसस्थानकालगतच्या रस्त्यांवरील खासगी वाहनांवरही दगडफेक केली. खासगी ट्रॅव्हलबस, ट्रक, खासगी कारवर दगडफेक करण्यात आली. शहरात सुमारे 9-10 ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. कोरेगाव भीमा येथील घटनेत जखमी झालेले दोनजण नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते.

जिल्ह्यातील राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव येथेही दगडफेक झाली. श्रीरामपुरात जमावाने व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने कार्यकर्ते पांगले. तेथे निषेध मोर्चाही काढण्यात आला. तणावग्रस्त परिस्थितीमुळे शहरात बंद वाळण्यात आला. राहुरी, कोल्हार बुद्रूक येथे रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. ट्रॅव्हल्ससह चार वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. कोपरगावातही आज बंदची हाक देण्यात आली आहे. राहाता येथे मोठा मोर्चा काढून नगर-मनमाड महामार्गावर सुमारे अडीच तास रास्तारोको करण्यात आला. दरम्यान, अस्तगाव फाटा तसेच  बसस्थानकातील चार बसवर दगडफेक झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीत नगर येथील शैलजा रासने व बाभळेश्‍वर येथून कोपरगावला महाविद्यालयात जाणारी सोनाली कदम ही विद्यार्थीनी जखमी झाली.दगडफेकीत सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.