Fri, Sep 21, 2018 13:41होमपेज › Ahamadnagar › पालकमंत्र्यांच्या खेळीने ‘प्लॅनिंग फेल’

पालकमंत्र्यांच्या खेळीने ‘प्लॅनिंग फेल’

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 9:54PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकासासाठी असलेल्या 50-54 चा निधी पदरात पाडून घेण्यासाठी खास ‘प्लॅनिंग’ करून आलेल्या जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांचा ‘डाव’ पालकमंत्र्यांच्या खेळीने ‘फेल’ गेला. ‘नियोजन’च्या ऐनवेळी झालेल्या नियोजनाने पदाधिकारीही अचंबित झाले. निधी वाटपात 60-40 वर तोडगा काढत नियोजन समितीची सभा शांततेत पार पडली. 50- 54 च्या निधी वाटपात जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त निधी देण्याचा आग्रह जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी केला होता. मात्र मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही पालकमंत्री निधी कपात करण्याच्या मनःस्थितीत असल्याचा पदाधिकार्‍यांचा संशय होता. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून पदाधिकार्‍यांनी सातत्याने  ‘मॅरेथॉन’ बैठका घेत नियोजनच्या बैठकीत पालकमंत्र्यांना निधीसाठी कसे राजी करायचे? याबाबत काथ्याकूट होत होती.

पालकमंत्री 60 टक्के निधी जिल्हा परिषदेला व 40 टक्के आमदार, खासदारांना यासाठी राजी होणार नाहीत, ही शक्यता गृहीत धरत काही सदस्य पदाधिकार्‍यांनी बैठकीत मतदान घेण्याचीही तयारी केली होती. त्यानुसार पदाधिकार्‍यांची सकाळीच बैठक पार पडली. त्यानंतर नियोजन समितीच्या बैठकीआधी पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत 60-40 प्रमाणे निधी मागणीचा प्रस्ताव ठेवला. त्यावर पालकमंत्र्यांनी प्रस्ताव मान्य करत पदाधिकार्‍यांना आश्‍चर्याचा धक्का दिला. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी 15 दिवसांपासून केलेली तयारी वाया गेली.  पदाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी 80-20 चा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्याबदल्यात इतर निधीला कात्री मारण्याची वेळ येऊ शकते, अशी शंका आल्याने पदाधिकार्‍यांनी 60-40 वरच ठाम राहणे पसंत केले. जिल्हयात नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिका,नगरपंचायतीत शासनाच्या निकषानुसार कामे होत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या विकासकामांसाठी बैठक घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष पॅकेज देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.