Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Ahamadnagar › ‘रेकॉर्ड’चा ताबा देण्याचे झेडपीला आदेश

‘रेकॉर्ड’चा ताबा देण्याचे झेडपीला आदेश

Published On: Jan 02 2018 12:53AM | Last Updated: Jan 01 2018 11:48PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

कीटकनाशके विक्रीसाठी परवाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत देण्यात येत होते. ते अधिकार आता राज्य शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना देण्यात आल्याने जिल्हा परिषदेकडील कीटकनाशक परवान्याच्या ‘रेकॉर्ड’चा ताबा देण्याचे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. यापुढे कीटकनाशक परवान्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्राधिकृत असणार हे. कीटकनाशकाचा परवाना घेण्यासाठी अर्जदाराला आता ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. त्या अर्जाची प्रिंट काढून तालुका कृषी अधिकार्‍यांकडे अर्ज सादर करावा लागेल. परवान्यासाठी ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर अर्जाची पडताळणी होईल. त्यानंतर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्थळपाहणी करतील. त्यांच्या शिफारशीनंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परवाना मंजूर करतील.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकार्‍यांकडे असलेले सर्व दस्तऐवज व प्राप्त प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह कीटकनाशक परवानगी संबंधी असलेले सर्व दस्तऐवजही हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. राज्याच्या कृषी संचालकांनी याबाबत आदेश दिले आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असलेल्या गळीत धान्य, तृण धान्य, मका  विकास,ऊस विकास, कृषी अभियांत्रिकीकरण, कापूस व कडधान्ये विकास, विशेष घटक, अपारंपरिक ऊर्जा विभाग अशा विविध योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग झालेल्या आहेत. अशातच आता कीटकनाशके विक्री व उत्पादनाच्या परवानगीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर कीटकनाशकांची विक्री करणे, वितरण व साठा करणे, वाणिज्यिक स्वरूपाची कीड नियंत्रण कामे करण्यासाठी परवाने देण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला होते. ते अधिकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. असे असले तरी बियाणे व खतांच्या परवान्यांचे अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे कायम ठेवण्यात आले आहेत.