होमपेज › Ahamadnagar › जिल्हा 32 हजार नावे मतदारयादीतून वगळले

जिल्हा 32 हजार नावे मतदारयादीतून वगळले

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 11:19PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यात नुकत्याच राबविण्यात आलेल्या छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात 32 हजार मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले. तर 60 हजार नवमतदारांनी नोंदणी केली आहे. 11607 शिक्षक मतदारांच्या प्रारूप यादीत बाराशे मतदारांची भर पडल्याने शिक्षक मतदारसंघ यादीतील मतदारांची संख्या 12 हजार 882 झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिली. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, तहसीलदार सुधीर पाटील, गणेश मरकड आदी उपस्थित होते.

1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांक आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात घेण्यात आला. त्यात 60 हजार 482  नवीन मतदारांची भर पडली. 10 हजार 504 मतदारांनी नावात दुरुस्ती केली तर, 2 हजार 552 मतदारांनी मतदारसंघात बदल करून घेतला. सध्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 17 लाख 30 हजार 186 पुरुष, 15 लाख 78 हजार 717  महिला तर 129 इतर मतदार आहेत. त्यातील 99.88 टक्के मतदारांचे फोटो आहेत. महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत 1 हजारामागे 905 इतके दोन वर्षांपूर्वी होते. त्यात 7 ने वाढ झाली आहे. 
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. त्यात 9720 पुरुष तर 3162 महिला असे 12 हजार 882 मतदार आहेत. मतदार यादीवर कुणाचा आक्षेप, दावे,हरकती असल्यास त्या नोंदविण्याचे आवाहन केले आहे.