Fri, Jul 19, 2019 15:46होमपेज › Ahamadnagar › शहर बससेवेसाठी नव्याने निविदा

शहर बससेवेसाठी नव्याने निविदा

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 10:37PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

शहर बससेवेबाबत वारंवार सूचना देऊनही दखल घेतली जात नाही. गाड्यांची अवस्था आजही पूर्वीप्रमाणेच असून मुदत देऊनही सुधारणा झालेल्या नाहीत. शहर बससेवेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे ‘यशवंत अ‍ॅटो’ला नुकसान भरपाई देणे तात्काळ बंद करावे व सेवेबाबत नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, असे आदेश स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी दिले आहेत. दरम्यान, नेहरु मार्केट उभारणीबाबत प्रशासनाने तात्काळ नव्याने कार्यवाही सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी काल (दि.29) झालेल्या सभेत दिले आहेत.

यशवंत अ‍ॅटोकडून शहरात असमाधानकारक सेवा दिली जात असल्याबाबत तसेच वाहनांची दुरवस्था झालेली असल्याबाबत सभापती जाधव यांनी 28 ऑगस्टच्या सभेत मुद्दा उपस्थित केला होता. अभिकर्ता संस्थेला एक महिन्याची मुदत सुधारणेसाठी देण्यात आली होती. सुधारणा न झाल्यास नवीन संस्थेची नियुक्‍ती करण्याचा ठरावही करण्यात आला होता. कालच्या सभेत सभापती जाधव यांनी अभियंता परिमल निकम यांच्याकडून आढावा घेतला. सदर संस्थेला नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यात कोणत्याही सुधारणा झालेल्या नसल्याचे अभियंता निकम यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्य निर्वाह निधीबाबत कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई दिली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्यानंतर सभापती जाधव यांनी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या.

नेहरु मार्केटच्या उभारणीबाबतही नव्याने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावाही त्यांनी घेतला. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष धोंगडे यांनी याबाबत माहिती दिली. मनपाने केलेले मूल्यांकन शासनाने रद्द केले होते. मनपाने पुन्हा मूल्यांकन केल्यास त्यावरही आक्षेप घेतला जाईल. त्यामुळे शासनाकडेच मार्गदर्शन मागवून त्यांच्याकडून मूल्यांकन काढून घेण्याचा प्रस्ताव येत्या आठवडाभरात सादर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर नगरसेवक दत्तात्रय कावरे यांनी शासनाच्या निर्णयाकडे लक्ष वेधत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचे मूल्यांकन सरकारी व्हॅल्युअरकडून काढण्यात आले होते, तेच 9.27 कोटींचे मूल्यांकन नगरविकास विभागाकडे सादर केल्यानंतर शासनाने ठराव विखंडीत केला असल्याचे त्यांनी सांगितले. 

मनपा अधिकार्‍यांनी विकसकाच्या दवाबाखाली बेल्टिंग पध्दतीचा वापर करून मूल्यांकन घटविल्याचा आरोपही कावरे व नगरसेवक बोराटे यांनी केला. बेल्टिंग पध्दत वापरुन मूल्यांकन करु नये, मनपाने स्वतःच ही जागा विकसित करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सभापती जाधव यांनी प्रशासनाला सूचना देत नेहरु मार्केटची उभारणी करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश सभेत दिले.