Thu, Jun 27, 2019 10:09होमपेज › Ahamadnagar › महापालिकेच्या खतप्रकल्प निविदेचेच झाले ‘खत

महापालिकेच्या खतप्रकल्प निविदेचेच झाले ‘खत

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:21PMनगर  :प्रतिनिधी

‘निरी’च्या प्रमाणपत्रावरुन वादग्रस्त ठरलेल्या बुरुडगाव कचरा डेपोतील खतनिर्मिती प्रकल्पाची निविदा रद्द करण्यासाठी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या आंदोलनानंतर आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन प्रमुखांना काल (दि.22) दिले. दरम्यान, पदाधिकार्‍यांनी आयुक्‍तांच्या घरी जावून दबाव टाकत निविदा प्रक्रियेवर सह्या घेतल्याचा तसेच यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही उपमहापौर छिंदम यांनी केला आहे.

खतनिर्मिती प्रकल्पाचा ठेका घेणार्‍या संस्थेकडे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. सदरचे प्रमाणपत्र असलेल्या संस्थेलाच निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल, अशी अट टाकणे अपेक्षित होते. यशस्वी ठेकेदाराला ‘निरी’चे प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक राहील, अशी चुकीची अट टाकून शुध्दीपत्रक काढण्यात आले आहे. गुरुवारी (दि.18) याबाबत आयुक्‍तांशी समक्ष चर्चा करुन ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर नव्याने निविदा काढण्याचेही त्यांनी मान्य केले होते. मात्र त्यानंतर काही पदाधिकार्‍यांनी आयुक्‍तांवर दबाव टाकून नियमबाह्य असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण करणेबाबत मंजुरी घेतली असल्याचा आरोप छिंदम यांनी केला होता.

त्यानुसार काल त्यांनी आयुक्‍तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले. पदाधिकार्‍यांनी दबाव टाकून चुकीची प्रक्रिया राबविण्यास भाग पाडल्याचा व यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप छिंदम यांनी केला. निविदा रद्द होईपर्यंय उठणार नाही, असे सांगत बंद खोलीत चर्चा करण्यासही त्यांनी नकार दिला. पथदिवे घोटाळ्यापेक्षाही हा मोठा घोटाळा असल्याचेही त्यांनी म्हटले. उपआरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना आंदोलनाची माहिती असतांनाही ते गैरहजर का राहिले? असा जाब त्यांनी विचारला. आंदोलन सुरु असतांनाच खा. दिलीप गांधी यांनी आयुक्‍तांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. 

त्यानंतर आयुक्‍त मंगळे यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन प्रमुखांना बजावले. फेरनिविदा काढण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्‍तांनी आदेशात म्हटले आहे. आंदोलनात नगरसेवक किशोर डागवाले, महेश तवले, नरेंद्र कुलकर्णी, गौतम दीक्षित, किशोर बोरा, राहुल रासकर, श्रीकांत साठे, तुषार पोटे, अभिजीत चिप्पा आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.