होमपेज › Ahamadnagar › लिटरबिन्स खरेदी संशयाच्या भोवर्‍यात

लिटरबिन्स खरेदी संशयाच्या भोवर्‍यात

Published On: Mar 05 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत होऊ घातलेल्या ‘लिटरबिन्स’ (लोखंडी कचरा पेट्या) खरेदीची प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. एका पदाधिकार्‍याच्या मर्जीतल्या ठेकेदाराची लाखो रुपयांनी जादा दर असलेली निविदा मंजूर करण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव टाकला जात आहे. निविदा प्रपत्रातील चुकीच्या तपशीलाचा आधार घेत लघुत्तम दराची निविदा बाद करण्याच्या हालचाली मनपात सुरु आहेत. त्यामागील लाखोंच्या ‘अर्थकारण’चीही चर्चा ठेकेदार वर्तुळात रंगली आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर कचरा टाकण्यासाठी लिटरबिन्स बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी सप्टेंबर 2017 मध्ये 500 लिटरबिन्स खरेदीची निविदा (क्र.1578) प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ठेकेदार, पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या संगनमतातून ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये नव्याने निविदा (क्र.1674) प्रसिद्ध करण्यात आली.

यात दोन पुरवठादारांनी निविदा दाखल केल्या आहेत. लोखंडी कचरापेट्या तयार करण्यासाठी मागविलेल्या या निविदेतील प्रपत्रात कामासाठी वापरावयाच्या साहित्याचा तपशील चुकीचा दिलेला असल्याचे पुढे आले आहे. लोखंडी लिटरबिन्सची खरेदी प्रस्तावित असताना, यात ‘स्टेनलेस स्टील’च्या (एसएस) साहित्याच्या वापराचाही पर्याय देण्यात आला आहे. लोखंडी व स्टीलच्या लिटरबिन्सच्या दरात मोठी तफावत असल्याने निविदेचे दर भरतानाही संभ्रम निर्माण झाला आहे. मुळातच लोखंडी लिटरबिन्स तयार करायच्या असल्याने ‘स्टील’च्या साहित्याचे दर मागविण्याचा पर्याय का देण्यात आला? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या कामासाठी एका निविदा धारकाकडून लोखंडी ‘लिटरबिन्स’साठी प्रतिनग 6900 रुपये या प्रमाणे 34.50 लाख रुपयांचा दर प्रस्तावित करण्यात आला आहे. तर दुसर्‍या निविदा धारकाने लोखंडी ‘लिटरबिन्स’साठी प्रतिनग 10,100 रुपये या प्रमाणे 50.50 लाख रुपयांचा व स्टीलच्या ‘लिटरबिन्स’साठी प्रतिनग 21,800 रुपये या प्रमाणे 1.09 कोटी रुपयांचा दर प्रस्तावित केला आहे. मनपाला लोखंडी लिटरबिन्स खरेदी करायच्या असल्याने नियमानुसार 6900 रुपये दराची निविदा मंजूर होण्यास कुठलीही अडचण नाही. मात्र, 10,100 रुपये व 21,800 रुपयांचे जादा दर प्रस्तावित करणारा ठेकेदार एका पदाधिकार्‍याच्या मर्जीतला असल्याने लघुत्तम दराची निविदा बाद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळेच निविदेचे लिफाफे उघडूनही अद्याप या निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर करण्यासही टाळाटाळ सुरु आहे. 

प्रपत्रातील चुकीच्या तपशीलाचा आधार घेवून 6900 रुपये दराची निविदा रद्द करण्यासाठी कागदपत्रांचा ‘खेळ’ रंगविण्यासही सुरुवात झाली आहे. या निविदा स्थायी समितीत मागवून लोखंडी ऐवजी स्टीलचे लिटरबिन्स लावण्याचा निर्णय घेत, त्याद्वारे जादा दराची निविदा मंजूर करण्यासाठी सुरु असलेले लाखोंचे अर्थकारणही सध्या चर्चेत आले आहे. पथदिवे घोटाळ्यातून महापालिकेची झालेली 34 लाखांची आर्थिक फसवणूक ताजी असतानाच आता पुन्हा एकदा वैयक्‍तिक स्वार्थापोटी मनपावर लाखोंचा बोजा लादण्याची तयारी पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या संगनमतातून सुरु असल्याचे चित्र आहे.