Mon, May 25, 2020 20:57होमपेज › Ahamadnagar › बाबुर्डी घुमटच्या गुन्ह्यात गंभीरची टोळी केली वर्ग

बाबुर्डी घुमटच्या गुन्ह्यात गंभीरची टोळी केली वर्ग

Published On: Dec 17 2017 1:31AM | Last Updated: Dec 17 2017 12:02AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

कौडगाव येथील विषारी दारुकांड प्रकरणात पोलिस कोठडी संपल्यानंतर जितू गंभीर, भीमराज आव्हाडसह 8 जणांना बाबुर्डी घुमट येथील विषारी दारुकांडाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. त्यांना काल (दि. 16) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आला आहे. पोलिस कोठडीत मिळालेल्यांमध्ये भीमराव गेणू आव्हाड (रा. पांगरमल), जगजितसिंग किसनसिंग गंभीर, हमीद आली शेख, जाकीर कादर शेख, सोनु उर्फ संदीप मोहन दुग्गल, जाकीर  शेख, अजित उर्फ नन्ना शेवाणी (सर्व रा. ताराकपूर), याकुब युनूस शेख (रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता, नगर), भरत रमेश जोशी (रा. सिव्हिल हाडको, नगर) यांचा समावेश आहे.

त्यांना न्यायालयात हजर केले असता 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बाबुर्डी घुमट येथे विषारी दारुने शहाजी चव्हाण व अशोक तुपेरे यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अहवालानंतर दोघांचा मृत्यू मिथिल अल्कोहोलमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सरकारी फिर्याद नोंदवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी पांगरमल येथे विषारी दारुने 9 जणांचा बळी गेला होता. त्यावेळी कौडगाव येथे 2 व बाबुर्डी घुमट येथे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नेवासा तालुक्यातही एकाचा मृत्यू झाला होता. विषारी दारुने जिल्ह्यात एकूण 14 जणांचा बळी गेल्याचे उघड झाले आहे.

या 14 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विषारी दारू ही जिल्हा रुग्णालयातील कँटीनमधून आणल्याचे उघड झालेले आहे. याप्रकरणी एकूण पाच वेगवेगळे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यातील जितू गंभीर टोळीविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केलेली आहे.  कौडगाव येथील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोनदा पोलिस कोठडी मिळाल्यानंतर 8 जणांना बाबुर्डी घुमट येथील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. वर्ग केलेल्या आरोपींना शनिवारी तपासी अधिकारी किशोरकुमार परदेशी यांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.