Wed, Jul 17, 2019 08:51होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यातील २१० चारा छावण्या काळ्या यादीत?

जिल्ह्यातील २१० चारा छावण्या काळ्या यादीत?

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 11:44PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

2012-13 व 2013-14 साली दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र या छावण्यांचा हिशेब ठेवतांना त्यात अनियमितता आढळून आल्या. अनियमितता आढळून आलेल्या  210 चारा छावण्या चालविणार्‍या संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची तयारी प्रशासनाने केली असून, याबाबत कारवाईला वेग आला आहे.

उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनास अनियमितता आढळून आलेल्या सर्व चारा छावण्यांच्या चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने याबाबत तहसीलदारांना पुढील कारवाई करण्याचे कळविले होते. मात्र कारवाईबाबत संभ्रम असल्याने तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. अनियमितता असलेल्या चारा छावणी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याने त्यांच्यावर सरसकट गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना कळविले होते.  त्यानंतर छावणी चालकांनी गुन्हे दाखल न करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

तत्कालीन चारा छावण्या ह्या बाजार समित्या, सहकारी सोसायट्या, पतसंस्था, सामाजिक प्रतिष्ठान, सार्वजनिक वाचनालये, दूध उत्पादक संस्था, चारोधाम ट्रस्ट, समाज प्रबोधन संस्था, मजूर सहकारी संस्था, बचत गट, स्वातंत्र्यसैनिक संस्था यांच्यामार्फत चालविण्यात येत होत्या. त्यावेळी या संस्थांवर पदाधिकारी असलेल्यांपैकी अनेक जण हे राजकारणात असून, कित्येकांचे चांगले राजकीय वजन आहे. एकूण 431 संस्थांपैकी 210 संस्था ह्या छावणी व चारा डेपो चालविण्यासाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून ही कारवाई कधी होणार? याबाबत उत्सुकता आहे.