Thu, Aug 22, 2019 04:14होमपेज › Ahamadnagar › आरक्षणासाठी आत्महत्या नको

आरक्षणासाठी आत्महत्या नको

Published On: Sep 13 2018 1:42AM | Last Updated: Sep 13 2018 12:32AMनगर : प्रतिनिधी

आरक्षणाची प्रक्रिया ही अतिशय किचकट, दीर्घकालीन चालणारी आहे.त्यासाठी व्यापक स्वरूपाचा लढा योग्य मार्गाने सुरू असताना, अशा प्रश्‍नांसाठी कुणीही आत्महत्येचा मार्ग पत्करू नये. आरक्षण, शैक्षणिक सवलती किंवा जीवनाच्या विविध टप्प्यांवरील समस्यांशी दोन हात करण्याची तयारी सर्वांनी ठेवली पाहिजे, असे सांगत विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांचे प्रबोधन करण्यात आले.

शहरातील राधाबाई काळे महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी किशोरी बबन काकडे हिने नुकतीच मराठा आरक्षण प्रश्‍नी आत्महत्या केली. अशा पद्धतीने आत्महत्यांचे सत्र फोफावणे समाज हिताचे नाही. निष्पाप, निरपराध विद्यार्थी-विद्यार्थिनींचे समाजाच्या प्रश्‍नांसाठी अशा पद्धतीने देहत्याग नक्कीच भूषणावह नाही. अशा आत्महत्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विद्यार्थ्यांशी संवाद व प्रबोधन अभियान सुरू करण्यात आले आहे. राधाबाई काळे महाविद्यालय व्यवस्थापनाच्या सहकार्याने किशोरी काकडे हिच्या निधनाबद्दल शोकसभा व विद्यार्थिनींशी संवाद, प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर, बाळासाहेब पवार, प्राचार्य दीनानाथ पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व महाविद्यालयांमध्ये अशा पद्धतीचे प्रबोधनपर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. विद्यार्थी, युवकांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी राज्यभर व्यापक अभियान सुरू करण्यात आले आहे, असे संजीव भोर व बाळासाहेब पवार यांनी सांगितले.