Mon, Apr 22, 2019 16:43होमपेज › Ahamadnagar › शिक्षक पुरस्कारावरून होणार वाद?

शिक्षक पुरस्कारावरून होणार वाद?

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 12:58AMनगर : प्रतिनिधी

शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार्‍या जिल्हा शिक्षक पुरस्कारावरून यंदा वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिक्षक निवडतांना आजी-माजी सदस्यांमध्ये चढाओढ लागली असून, ‘झंजट नको’ म्हणून जिल्हा परिषदेने निवडीचे अधिकार विभागीय आयुक्तांना देत आपली बाजू ‘सेफ’ केली आहे.

जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक असे 14 शिक्षक निवडण्यात येतात. शिक्षकांना निवडीसाठी विशेष प्रक्रिया राबवण्यात येते. पुरस्कारासाठी शिक्षकाकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली आहे. त्यामध्ये शिक्षकांचा शिकवण्याचा अनुभव, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, शैक्षणिक साहित्याचा वापर, शिक्षकाने तयार केलेले साहित्य, त्याची दैनंदिन अध्यापनातील उपयुक्तता तसेच शिक्षकांच्या वैयक्तिक बाबींचे मूल्यमापन करण्यात येते. शिक्षकाचा शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय कार्यातील सहभाग, शालेय उपक्रम, वर्ग अभिलेखे, शिक्षक शिकवत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तर चाचणीचा निकाल, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले यश यासह गोपनीय अभिलेखे यांचा विचार करण्यात येतो. ही सर्व माहिती शिक्षकाला स्वतः भरून द्यावी लागते. या माहितीसाठी शिक्षकांना शंभर गुण देण्यात येतात.

तर 25 गुणांची परीक्षा ही तालुकास्तरावरुन आलेल्या आलेल्या यादीवरून घेण्यात येते. नुकतीच ही परीक्षा जिल्हा परिषदेतही घेण्यात आली. परंतु परीक्षेसाठी अनुपस्थित असतानाही अनेक शिक्षकांचे गुण जास्त असून, त्यांना पुरस्कारासाठी निवडल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांकडून होत आहे. आपल्या ओळखीचा, गटातील अथवा नातेवाईक असलेल्या शिक्षकांसाठी जिल्हा परिषदेच्या आजी-माजी सदस्यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यासाठी तालुका पातळीवरून ‘सेटिंग’ लावत पुरस्कारासाठी स्वतःच्या मर्जीतले नाव रेटण्याचा प्रयत्न होत आहे.

मागील वर्षी जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच निंबोडी शाळेची दुर्घटना घडली. त्यामुळे जिल्हा शिक्षक पुरस्कारांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. गेल्या वर्षी एक महिना कार्यक्रम उशिरा घेण्यात आला. जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या मर्जीतील शिक्षकांना पुरस्कार मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरू केले होते. पूर्वीच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या मर्जीतील शिक्षकांसाठी जोर लावला होता. त्यामुळेच की काय? यंदा जिल्हा परिषदेने पुरस्कारासाठी शिक्षकांची नावे जाहीर न करता नावांची यादी करून मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवली आहे. ही यादी विभागीय आयुक्तांकडे जाऊन आता पाच दिवस झाले असले तरी, विभागीय आयुक्तांनी या यादीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.