होमपेज › Ahamadnagar › पंजाब-हैद्रराबाद दरम्यान लुटणारी टोळी जेरबंद

पंजाब-हैद्रराबाद दरम्यान लुटणारी टोळी जेरबंद

Published On: Aug 29 2018 1:30AM | Last Updated: Aug 29 2018 12:35AMनगर : प्रतिनिधी

पंजाबपासून हैद्रराबादपर्यंत फिरून लुटणार्‍या टोळीला नगर शहरातील चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या टोळीतील 6 जणांना तोफखाना पोलिसांनी तेलंगणा येथून आणले आहे. त्यांच्याकडून शहरातील डॉ. दीपक यांचे दोन आयपॉड, मोडम हस्तगत करण्यात आले आहे.

अटक केलेल्यांमध्ये भोजराज सतीश (रा. गांधीनगर, थीरुची श्रीरंगम, तामिळनाडू), गुरगन्न कन्नन, मुरगन्न प्रभाकरन, मुरगन्न साथीवेल, लक्ष्मीनन नारायणन (चौघे रा. हरबजकलनी, मल्ल्यपेठ, श्रीरंगम, तामीळनाडू), विजयनन सिताराम (रा. रामाजीनगर, हरिभास्कर, मल्लपेठ, श्रीरंगम) यांचा समावेश आहे. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, 16 जुलै रोजी दुपारी दोन वाजता सावेडी परिसरात डॉ. दीपक हे त्यांच्या कारमध्ये बसले होते. त्यावेळी पैसे खाली पडल्याची बतावणी करून चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून कारमधील ऑयपॉड व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली होती. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र खोंडे हे करीत होते. 

देशभरातील विविध राज्यांत चोरी करणारी टोळी तेलंगणा पोलिसांनी पकडली होती. या टोळीने नगरमधील चोरीची कबुली दिली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार खोंडे, पोलिस कर्मचारी हनुमंत आव्हाड, विक्रम वाघमारे, ज्ञानेश्‍वर गोरे आदींचे पथक तेलंगणाला गेले. त्यांना तोफखाना पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले. या टोळीकडून शहरातील आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.