होमपेज › Ahamadnagar › ग्रा.पं.साठी ८५ टक्के मतदान

ग्रा.पं.साठी ८५ टक्के मतदान

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 11:47PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हाभरातील 66 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 85 टक्के मतदान झाले आहे. चार मते देताना मतदारांची मात्र चांगलीच तारांबळ उडत होती.  नगर तालुक्यातील बारदरी येथे मात्र फक्त सरपंचपदासाठीच मतदान झाले आहे. आज सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. 66 गावांचे कोण कारभारी होणार याकडे मात्र गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

माहे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने एक- दोन महिने अगोदर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे उर्वरित 66 ग्रामपंचायतींसाठी आज (दि.26) मतदान घेण्यात आले. अकोले तालुक्यातील पैठण येथील सदस्यांच्या 9 जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे फक्त तीन जागांसाठी मतदान घेण्यात आले. 

नगर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी बारदरी ग्रामपंचायतीचे सर्व सात सदस्य बिनविरोध झाल्याने फक्त सरपंचपदासाठी मतदान झाले.सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने 66 गावांत मतदानासाठी कार्यकर्त्यांची सकाळपासूनच धावाधाव सुर होती. सकाळी दहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संथ गतीने सुर होती. 

त्यानंतर मात्र मतदारांना घराबाहेर काढण्यास कार्यकर्त्यांना यश आले आहे. गावपातळीवरील निवडणूक असल्याने एकाएका मतदाराला शोधून काढून त्यांना मतदानास भाग पाडण्यात आले.
प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त होता.66 गावांतील 1 लाख 61 हजार 109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला आहे.एकूण मतदानाच्या तुलनेत 84.78 टक्के मतदान झाले आहे. कर्जत तालुक्यातील सर्वांधिक 96.39 टक्के मतदान झाले आहे.कोपरगाव तालुक्यात सर्वांत कमी 81.91 टक्के मतदान झाले आहे.