होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांच्या खात्यावर ५१२ कोटी जमा

शेतकर्‍यांच्या खात्यावर ५१२ कोटी जमा

Published On: Jan 05 2018 1:04AM | Last Updated: Jan 04 2018 10:09PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यावर 512 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याचा एकूण 1 लाख 72 हजार 940 शेतकर्‍यांना लाभ झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. असे असले तरी कर्जमुक्ती घोषणेच्या दिनांकापासून कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंतच्या कालावधीचे व्याज शेतकर्‍यांनाच भरावे लागणार आहे.

कर्जमाफीच्या पहिल्या ग्रीन लिस्टमध्ये दोन हजार 354 शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यापैकी 2 हजार 338 शेतकर्‍यांच्या खात्यावर 12 कोटी 35 लाख 39 हजार 52 रुपये वर्ग करण्यात आले. दुसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये 5 हजार 128 शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यापैकी 751 शेतकर्‍यांच्या खात्यावर 2 कोटी 67 लाख 48 हजार 24 रुपये जमा करण्यात आले आहेत.

तिसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातल्या 77 हजार 939 शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यापैकी 55 हजार 607 शेतकर्‍यांच्या खात्यावर 264 कोटी 5 लाख 21 हजार 203 रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. चौथ्या ग्रीन लिस्टमध्ये सर्वाधिक 1 लाख 12 हजार 44 शेतकरी समाविष्ट आहेत. त्यापैकी 86 हजार 78 शेतकर्‍यांच्या खात्यावर 149 कोटी 36 लाख 80 हजार 152 शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. मागील आठवड्यात शासनाने पाचवी ग्रीन लिस्ट जारी केली. त्यात 50 हजार 162 शेतकरी आहेत. त्यापैकी 28 हजार 166 शेतकर्‍यांच्या खात्यावर 84 कोटी 62 लाख 57 हजार 251 रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांची तपासणी झाल्यानंतर कर्जमाफीचे पैसे वर्ग करण्यात येत आहेत. जिल्ह्यातल्या 2 लाख 47 हजार 627 शेतकर्‍यांसाठी एकूण 837 कोटी 48 लाख 76 हजार 66 रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यापैकी 520 कोटी 76 लाख 81 हजार रुपये बँकांना प्राप्त झाले आहेत. शेतकर्‍यांचे खाते तपासल्यानंतर कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात येत आहे. आगामी आठवडाभरात पहिल्या ते पाचव्या ग्रीन लिस्टमधील शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.