Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Ahamadnagar › सिंचन प्रकल्पांसाठी ५.४० कोटी रुपये!

सिंचन प्रकल्पांसाठी ५.४० कोटी रुपये!

Published On: Aug 15 2018 1:22AM | Last Updated: Aug 15 2018 1:22AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील चार तालुक्यांतील 9 लघुसिंचन प्रकल्पांसाठी शासनाच्या जलसंधारण विभागाने 5.40 कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील नगर, राहुरी, पाथर्डी व शेवगाव या तालुक्यांतील कामांचा समावेश आहे.

या 4 तालुक्यांतील 9 गावांतील 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेचे हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या खर्चाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी शासनाच्या जलसंधारण विभागाकडे सादर केले होते. सन 2017-18 च्या सामाईक दरसूचीवर आधारित अंदाजपत्रकास मंगळवारी शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

यामध्ये नगर तालुक्यातील कापूरवाडी (कराळेमळा) येथील प्रकल्पासाठी 52.48 लाख रूपये व पिंपळगाव माळवी (गुंडमळा) येथे 73.60 लाख रूपये, पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे 59.52 लाख रूपये, चिचोंडी येथे 49.66 लाख रूपये व कोळसांगवी (घाणा) येथे 38.53 लाख रूपये, राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे 75.26 लाख रूपये, शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे 49.13 लाख रूपये, मलकापूर येथे 96.27 लाख रूपये व वरूर येथे 45.79 लाख रूपये खर्चाच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या अंदाजपत्रकास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांची मान्यता घेऊन नंतर तांत्रिक मान्यता  प्रदान करावी. मंजूर खर्चाच्या मर्यादेतच कामे करण्यात यावीत. शासनाच्या निर्णयानुसार लाभधारकांची पाणीवापर संस्था स्थापन करण्यात यावी. कामे पूर्ण झाल्यानंतर सदर प्रकल्पांच्या देखभाल-दुरूस्तीची कामे या संस्थांकडे हस्तांतरित करण्यात यावीत. हस्तांतरणानंतर दुरूस्तीचा खर्च लाभार्थ्यांकडून करण्यात यावा, आदी अटी-शर्तींच्या अधीन राहून या प्रकल्पांना शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.