Fri, Apr 26, 2019 09:36होमपेज › Ahamadnagar › तब्बल ३९ वर्षांनंतर लागले ‘त्या’ जागेला मनपाचे नाव!

तब्बल ३९ वर्षांनंतर लागले ‘त्या’ जागेला मनपाचे नाव!

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:10AMनगर : प्रतिनिधी

बुरुडगाव प्रभाग समितीचे कार्यालय असलेल्या तब्बल दोन एकर जागेला तब्बल 39 वर्षांनंतर महापालिकेचे नाव लागले आहे. ‘भूमिअभिलेख’च्या गलथान व निष्काळजी कारभारामुळे या जागेला जिल्हा परिषदेचे नाव लागले होते. विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी केलेला पाठपुरावा व ‘नगररचना’तील अधिकार्‍यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे दोन दिवसांपूर्वी या जागेच्या सातबारा उतार्‍यावर मनपाच्या नावाची नोंद झाली आहे.

तत्कालीन नगर परिषदेने भगवानदास गांधी यांच्या परिवाराकडून 1979 साली या 2 एकर 3 गुंठे जागेची खरेदी केली होती. मात्र, भूमिअभिलेख विभागाने या जागेवर जिल्हा परिषदेचे नाव नोंदवले होते. विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी याबाबत पाठपुरावा सुरु केला. मनपाच्या नगररचना विभागात मानधनावर नियुक्त असलेल्या निवृत्त तहसीलदारांच्या पथकाने याबाबत माहिती संकलित केली. तत्कालीन नगर परिषदेचे खरेदी खत मिळविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. जिल्हा परिषदेकडेही सदरही जागा त्यांच्या नावे असल्याची नोंद नव्हती. भूमिअभिलेखच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार घडल्याचे समोर आल्यानंतर मनपाने सदरच्या जागेवर नाव लावण्यासाठी दावा दाखल केला.
तहसीलदारांसमोर याबाबत सुनावणीही पार पडली. मनपाला जागा विकणार्‍या गांधी परिवारातील सदस्यांसह जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकार्‍यांनीही म्हणणे सादर केले. मूळ खरेदी खतासह इतर कागदपत्रे मनपाकडून सादर करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांनी या जागेवर मनपाचे नाव लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 16 जून रोजी या जागेच्या सातबारा उतार्‍यावर मनपाच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 39 वर्षांनंतर या जागेला मनपाचे नाव लागले आहे. निवृत्त तहसीलदार सर्जेराव शिंदे, निवृत्त सर्व्हेअर रविंद्र जेवरे, खलील पठाण यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.