Sun, Oct 20, 2019 12:23होमपेज › Ahamadnagar › सत्ताधार्‍यांकडून 9 कोटींचा बोजा

सत्ताधार्‍यांकडून 9 कोटींचा बोजा

Published On: Feb 11 2018 12:53AM | Last Updated: Feb 10 2018 11:15PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी अर्थसंकल्पाचे इतिवृत्त कायम करताना, त्यात नागरी सुविधांचा विकास व मोबाईल टॉवर प्रशासकीय शुल्क अशा नावांनी दोन लेखाशिर्ष तयार करून, अनुक्रमे 5 व 4 अशी एकूण 9 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये एक रूपयाही शिल्लक नसताना, बेकायदा कामे खतवून त्याचे ठेकेदारांना वाटपही करण्यात आले आहे. या कामांची बिले देणार कुठून? असा सवाल नगरसेवक संजय घुले यांनी उपस्थित केला आहे.

महापालिका प्रशासनाकडून सन 2017-18 चा अर्थसंकल्प सादर करताना, या दोन्ही लेखाशिर्षांचा त्यामध्ये समावेश नव्हता. मात्र, सत्ताधार्‍यांनी अर्थसंकल्पीय सभेचे इतिवृत्त मंजूर करताना, त्यामध्ये या दोन्ही लेखाशिर्षांचा ‘तसेच’ म्हणून समावेश केला. त्यात नागरी सुविधांचा विकास या लेखाशिर्षावर 5 कोटी तर मोबाईल टॉवर प्रशासकीय शुल्कावर 4 कोटी रूपये तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात या लेखाशिर्षात एक रूपयाही शिल्लक नसताना रोखीची तरतूद दाखवून, त्यातून अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामध्ये बहुतांशी पथदिव्यांच्या कामांचा समावेश आहे.

एवढेच नाहीतर  मोबाईल टॉवर प्रशासकीय शुल्क या लेखाशिर्षातून तर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांसाठी तरतूद शिल्लक नसताना प्रशासनाने त्यास मंजुरी दिलीच कशी? असा सवाल करीत, त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेवर या बेकायदा कामांचा 9 कोटी रूपयांचा बोजा सत्ताधार्‍यांमुळे पडणार आहे. शासनाच्या विविध योजनांतील निधी अखर्चित असताना, ती कामे पूर्ण करण्याऐवजी मनपा फंडावर नाहक बोजा टाकण्यामागे गौडबंगाल काय, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे याबाबत आयुक्‍तांनी सर्व नगरसेवकांना अहवाल द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.