Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Ahamadnagar › घोटाळ्याप्रकरणी कारवाई करा

घोटाळ्याप्रकरणी कारवाई करा

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 29 2018 1:33AMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्याची चौकशी होऊन महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मनपाकडून तोफखाना पोलिसांना चौकशी अहवाल सादर झाल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरु असल्याबाबत ‘घोटाळा सिध्द होऊनही चौकशीचे तुणतुणे!’ या मथळ्याखाली ‘पुढारी’ने 24 जानेवारी रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. नगरविकास विभाग व गृह विभागाकडून या वृत्ताची दखल घेण्यात आली असून राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी त्वरीत कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

29 डिसेंबर रोजी स्थायी समितीच्या सभागृहात पथदिव्यांच्या कामातील 40 लाखांचा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर महासभेतही या विषयावरुन गदारोळ झाल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सविस्तर अहवाल सादर करुन महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट केले. तसेच कामांच्या जबाबदारीनुसार या प्रकरणात अधिकार्‍यांवरही दोष निश्‍चित करण्यात आले. पोलिसांनाही याबाबतचा अहवाल सादर करुन दोषींवर कारवाई करण्याचे पत्र आयुक्‍तांनी पोलिस प्रशासनाला दिले. पोलिसांनी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा तपास करण्याऐवजी चौकशीच्या नावाखाली विविध मुद्द्यांची माहिती मागवत वेळकाढूपणा सुरु केला आहे.

या संदर्भात ‘पुढारी’ने वृत्त प्रसिध्द करुन गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आणली होती. नगरविकास विभाग व गृह विभागाचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत आवश्यक ती कारवाई करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. मनपास्तरावर चौकशी पूर्ण होऊन त्यात फसवणूक झाल्याबाबतचा स्पष्ट अहवाल, फाईल चोरी व खोटी सही करुन फसवणूक झाल्याबाबत तोफखाना पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारी व त्यावर अद्याप दाखल न झालेला गुन्हा, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा घेण्यात आलेला आधार आदी बातमीमधील मुद्दे अधोरेखित करुन त्याचे स्पष्टीकरण ना. पाटील यांनी मागविले आहे.

शिवसेनेच्या आजच्या आंदोलनाकडे लक्ष!

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पथदिवे घोटाळ्याबाबत पोलिस अधीक्षक व आयुक्‍त घनश्याम मंगळे यांची दि. 25 रोजी भेट घेतली. आयुक्‍तांनीही स्वतः फिर्याद दाखल करण्याची तयारी दर्शविली. मात्र, पोलिस अधिक्षकांनी उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी पोलिसांचा अहवाल सादर करणार असल्याचे व त्यानंतर फिर्याद घेणार असल्याचे आयुक्‍तांना सांगितले होते. त्यानंतर राठोड यांनी एक दिवसाची मुदत देत गुन्हा दाखल न झाल्यास स्वतःच उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल झालेला नसल्याने शिवसेनेच्या आजच्या (दि.29) आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.