Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Ahamadnagar › शाळांचे थकित वीजबिल शिक्षण विभाग भरणार!

शाळांचे थकित वीजबिल शिक्षण विभाग भरणार!

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:42AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

मराठी शाळांच्या थकित वीज बिलासंदर्भात अखेर तोडगा निघाला आहे. शिक्षण विभागाकडून महावितरणला 40 कोटी रूपये देवून शाळांचे थकित वीजबिल माफ करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच शिक्षण मंत्री व ऊर्जा मंत्री यांनी राज्यातील मराठी शाळा सोलरयुक्त करुन, शासकीय शाळा व रुग्णालयांना घरगुती दरापेक्षा कमी दर आकारण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा डिजिटल होत आहेत. त्यासाठी विजेचा वापर होत असताना शाळांना महावितरणकडून व्यावसायिक दराने वीज आकारली जाते. शाळांना ते परवडत नसल्याने अनेक शाळांचे वीजबिल थकल्याने त्यांची वीज महावितरणकडून कापण्यात आली. या प्रश्‍नावर शिक्षक परिषदेने आवाज उठवून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावर त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत नागपूरला संयुक्त बैठक घेतली.

यावेळी ऊर्जा व शिक्षण विभागाचे सचिव, महावितरणचे अधिकारी, विभागीय शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, राजेश सुर्वे, पूजा चौधरी, सुनील पाटील, प्रा. सुनिल पंडित, सुभाष गोतमारे, जुगलकिशोर बोरकर, भरत मडके आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील 20 हजार 233 जि.प. शाळा व मान्यता प्राप्त शाळा या सोलरयुक्त करण्यासाठी येत्या दोन वर्षांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 500 कोटींची तरतूद केली जाणार आहे. सोलर शाळा करणार्‍या एजन्सीकडून 15 वर्षे देखभाल दुरुस्तीची सेवा देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

मार्च 2018 च्या अधिवेशनापर्यंत प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गांत एक पंखा, दोन लाईट व एक डिजिटल सिस्टीम वापरता येईल. याकरिता राज्यभर किती निधी व किती साहित्य लागेल? याबाबतीत नियोजन करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या. 40 कोटींची थकित रक्कम शिक्षण विभाग महावितरणाला देणार असून, सदर शाळांचे थकित वीजबिल माफ करण्यात येणार आहे. शासकीय शाळा व रुग्णालयांना घरगुती दरापेक्षा कमी दर लावण्याचे आश्‍वासन या बैठकीत देण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.