Fri, Apr 19, 2019 08:00होमपेज › Ahamadnagar › शाळा, अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे

शाळा, अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 10:50PMनगर : प्रतिनिधी

ग्रामविकास आराखडा तयार करतांना त्यात ग्रामपंचायत इमारती, गावातील शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी आता शासन निर्णयाद्वारे ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास आराखड्यात शाळा, अंगणवाड्यांच्या इमारती बांधकामासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश शासनाने दिल्याने जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जिल्ह्यात निंबोडी शाळा दुर्घटना झाल्यानंतर मोडकळीस आलेल्या व दुरुस्ती करावयाच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. जिल्हा परिषदेकडे या इमारतींच्या बांधकामासाठी निधी नसल्याने शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येत होती. संपूर्ण राज्यभरात मोठ्या संख्येने शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी निधीची मागणी होत असल्याने राज्य शासनापुढील अडचणी वाढत होत्या.

इतक्या मोठ्या संख्येने इमारती बांधण्यासाठी राज्य सरकारपुढे आर्थिक संकट उभे असल्याने त्यातून मार्ग काढतांना आता ह्या इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतींवर ढकलण्यात आली आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींचा विकास आराखडा अंतिम करतांना कोणत्या बाबींचा समावेश करावा याबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे दिल्या आहेत. ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींनी चार वर्षांचे आराखडे तयार केले आहेत. त्यात वेगवेगळ्या निधीच्या स्रोतातून उपलब्ध होणार्‍या निधीचा वस्तुनिष्ठ अंदाज नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. 
2018-19 सालच्या ग्रामपंचायत विकास आराखड्यात मागील आर्थिक वर्षातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधी तरतूद करावी लागणार आहे. शाळा, अंगणवाड्यांसाठी निधी तरतूद केल्यावर इतर योजनांसाठी प्राधान्यक्रमानुसार तरतूद करावी लागेल. वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी 10 टक्के पेक्षा जास्त निधी खर्च करता येणार नाही. आरोग्य, शिक्षण व उपजिवीकेसाठीच्या 25 टक्के निधीत सामूहिक उपक्रम घ्यावे लागतील.