Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Ahamadnagar › सबजेल’ इमारत धोकादायक

सबजेल’ इमारत धोकादायक

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:33PM नगर : गणेश शेंडगे

नगरच्या सबजेलची इमारत ही 300 ते 350 वर्षांपूर्वीची जुनी आहे. त्यामुळे येथे वास्तव्य करणे अयोग्य, चुकीचे आहे, असे असे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याने वास्तूपरीक्षण अहवालानंतर (स्ट्रक्च्रल ऑडिट) कारागृह प्रशासनाला सुमारे 6 महिन्यांपूर्वीच दिलेले आहे. बंदिवानांच्या जिविताला धोका असतानाही कारागृह प्रशासन निद्रिस्त आहे. सध्याच्या इमारतीची दुरुस्ती अथवा नारायणडोह येथील नवीन इमारतीबाबत ठोस पाठपुरावा सुरू असल्याचे दिसत नाही. 26 जून 2016 रोजी रात्री साडेदहा वाजता कारागृहातील छताचा काही भाग अचानक कोसळला होता. यात तीन महिला बंदिवान जखमी झाल्या होत्या. त्यामुळे सबजेल प्रशासनाच्यावतीने कारागृह अधीक्षकांनी 27 जुलै 2016 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून सबजेल इमारतीचे वास्तूपरीक्षण करणेबाबत कळविलेले होते.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने उपकारागृह इमारतीचे वास्तूपरीक्षण करून त्याबाबतचा अहवाल कारागृह प्रशासनाला कळविला होता. सदर अहवालानुसार सबजेलची इमारत ही 300 ते 350 वर्षे जुनी आहे. या वास्तूची सद्यस्थिती असुरक्षित, राहण्यास अयोग्य असल्याने छोटा-मोठा भूकंप, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यापासून इमारतीस धोका पोहोचू शकतो, असे नमूद केलेले आहे. 
सुमारे सहा महिन्यांपूर्वी इमारत राहण्यास अयोग्य असल्याचा अहवाल बांधकाम खात्याने कारागृह प्रशासनाला दिलेला आहे. तरीही सध्या राहण्यास अयोग्य इमारतीत 232 बंदिवान आहेत. अतिरिक्त बंदिवान नाशिक व पुण्यातील येरवडा येथे पाठविण्यात येत आहेत. बंदिवानांच्या जिविताला गंभीर धोका असतानाही कारागृह प्रशासन निद्रिस्त असल्याचा आरोप होत आहे.

या इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी अथवा नारायणडोह येथील प्रस्तावित जिल्हा कारागृह इमारतीचे काम युद्धपातळीवर होण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालिन कारागृह अधीक्षकांनी नारायणडोह येथील नूतन वास्तूसाठी पाठपुरावा करून तेथील संरक्षण कुंपणाचे काम करून घेतले. परंतु, सध्याच्या प्रशासनाकडून योग्य पाठपुरावा होत नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात आहे. निंबोडी येथील शालेय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना ताजी आहे. तसेच यापूर्वी कारागृह इमारत कोसळून महिला बंदिवान जखमी झाल्याची घटना घडूनही कारागृह प्रशासनाने यातून कुठलाच बोध घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे अनेक बंदिवानांचा जीव धोक्यात आहे.