Wed, Jul 24, 2019 06:16होमपेज › Ahamadnagar › पोस्ट खातेही बँकिंग क्षेत्रात!

पोस्ट खातेही बँकिंग क्षेत्रात!

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 13 2017 10:51PM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

भारतीय पोस्ट खाते आता बँकिंग क्षेत्रात उतरले आहे. जानेवारी महिन्यात रायपूर व रांची येथे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची शाखा उभारुन, सेवेचा प्रारंभ देखील झाला आहे. मार्च महिन्यात  शहरातील प्रधान डाकघर कार्यालयाच्या इमारतीत शाखेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील जनतेला पोस्ट पेमेंट बँकेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशाभरात 1 लाख 54 हजार कार्यालयांतून पोस्ट खात्याचा कारभार सुरु आहे. कार्यालयाची आणि कर्मचार्‍यांची संख्या लाखांपेक्षा अधिक असल्याने  पोस्ट खात्याचा पसारा थेट गावपातळीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय पोस्ट खात्याने बँकिंग क्षेत्रात पाऊल टाकण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिग सेवा देण्यास मान्यता देखील दिली आहे.त्यानुसार पहिल्या टप्यात देशभारात 650 शाखा, तर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखा सुरु होत आहेत. 

या बँकेद्वारे सर्व सेवा ऑनलाइन मिळणार आहेत. या माध्यमातून एनएफटी, आरटीजीएस, विमान, रेल्वे तिकीट ऑनलाइन पेमेंट आदी सेवा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. डिसेंबर 2018 पर्यंत 3 लाख कर्मचारी या बँकेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहेत. राज्यभरातील सर्वच शाखा ग्रामीण पोस्ट विभागाला जोडल्या जाणार आहेत. नगर शहरात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची शाखा येत्या मार्च महिन्यात सुरु होणार आहे. या शाखेच्या माध्यमातून पोस्टाच्या खातेदाराला या बँकिंग सेवेचा लाभ मिळणार आहे. खातेदाराला विश्‍वसनीय सेवा दिली जाणार असून, प्रधान डाकघर कार्यालयाच्या इमारतीत बँकेची शाखा सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे नगर येथील वरिष्ठ पोस्ट मास्तर अंबादास टेकाळे यांनी सांगितले.