Mon, May 20, 2019 10:35होमपेज › Ahamadnagar › राजकीय नेत्यांच्या संपत्तीबाबत तक्रार नोंदवा

राजकीय नेत्यांच्या संपत्तीबाबत तक्रार नोंदवा

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 13 2017 10:40PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

‘निवडणुकीनंतर राजकीय नेत्यांच्या संपत्तीमध्ये अल्पावधीतच होणार्‍या  भरमसाठ वाढीबाबत माहिती असल्यास पुराव्यासह तक्रार नोंदवा;  आठवड्याच्या आतच कारवाई करू’ असे स्पष्ट उत्तर राज्याचे मुख्य आयकर आयुक्त अमरेशचंद्र शुक्ला यांनी काल आयकर विषयावर आयोजित एका चर्चासत्रात ऐनवेळी विचारलेल्या प्रश्‍नावर दिले. नगरची सी.ए.इन्स्टिट्यूट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि उद्योजकांच्या आमी यांच्या संयुक्त विद्यमाने परस्पर संवादावर आधारित या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.पुणे विभागाचे आयकर आयुक्त सत्यकाम मिश्रा, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सीए प्रसाद  भंडारी, मराठा चेंबर्सचे अध्यक्ष अरविंद पारगांवकर, आमीचे अध्यक्ष अशोक सोनवणे, राजेंद्र कटारिया, प्रकाश गांधी, किरण भंडारी, ज्ञानेश कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आयकर आयुक्त शुक्ला यांनी यावेळी अध्यात्म, योगा-ध्यान आणि आयकर या तिनही विषयांची सांगड घालून लोकांना प्रामाणिकपणे आणि न घाबरता आयकर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. आणि सभागृहातच 15 मिनिटांच्या ध्यानाचे प्रात्यक्षिकही दिले. या चर्चासत्रात स्थानिक व्यापारी असोसिशनचे सदस्य मदनलाल ओसवाल यांनी जाहीरपणे ‘ देशात सर्वसामान्य नागरिक भितीने का होईना पण कर भरतात.परंतू राजकीय नेते मात्र निवडून आल्यानंतर थोड्याच दिवसात प्रचंड संपत्तीचे मालक होतात. त्यांना मात्र कोणीच का विचारत नाही. गेल्या कित्येक वर्षात एक दोन अपवाद वगळता कोणत्याही राजकीय नेत्याविरूध्द आयकर विभागाने कारवाई केल्याचे उदाहरण नाही.

ही विसंगती का?’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर उत्तर देताना शुक्ला म्हणाले,‘ आपल्या 35 वर्षांच्या कार्यकाळात दोन खासदार आणि एका मंत्र्यांची चौकशी मी केलेली आहे. तुमच्याकडे किंवा आणखी कोणाकडेही अशा पध्दतीने अल्पावधीत श्रीमंत झालेल्या राजकीय नेत्यांची माहिती असेल तर ती पुराव्यानिशी माझ्याकडे द्या. एकाच आठवड्याच्या आत संबंधितांविरूध्द निश्‍चितच योग्य ती कारवाई केली जाईल.आपल्या देशात लोकं स्वत:च्या दु:खाने नाही, तर इतरांच्या ‘सुखा’नेच जास्त दु:खी होतात, अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली. सर्वसामान्य नागरिकांना आयकर रिटर्न दाखल करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी विभागाने शिबीरे भरविण्याचे नियोजन केले असून या शिबीरांमध्ये सीए इन्स्टिट्यूट, आमी आणि मराठा चेंबर तसेच आयकर विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार आयकर दात्यांची व्याप्ती वाढविण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी दर बुधवारी दुपारी 3 ते 4 यावेळेत कोणीही सामान्य नागरिक आपल्या शंका आयकर अधिकार्‍यांना विचारून त्याचे निरसन तात्काळ करू शकतील. यावेळी सर्वश्री सत्यकाम मिश्रा, अरविंद पारगांवकर, अशोक सोनवणे यांची भाषणे झाली. प्रसाद भंडारी यांनी प्रास्तविक केले. ज्ञानेश कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले तर किरण भंडारी यांनी आभार मानले. या वेळी संयुक्त आयकर आयुक्त अभिषेक मेश्राम, पुण्याचे संयुक्त आयकर आयुक्त सम्राट राही, नगरचे सह आयकर आयुक्त प्रशांत गांधले व आयकर अधिकारी हेमलता पारखे, स्मीता भालेराव, बशीर सय्यद, रामदास बोधले, व्ही.जे. गायकवाड आदी उपस्थित होते.